Breaking News
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचीही मिळाली परवानगी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नेरुळ सेक्टर-1 येथील छत्रपती शिवजी महाराज चौकाचा कायापालट करण्यात आला आहे. याच चौकात आकर्षक देखाव्यांसह आकर्षक मेघडंबरीमध्ये जवळजवळ 35 लाख रुपये खर्चून शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच नेरुळ सेक्टर-1 येथील चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला पुतळा साकारण्यात येणार असून पालिका अभियंता विभागाकडून येथील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
नेरूळ येथील चौकात शिवरायांच्या मावळ्यांचा आकर्षक देखावाही साकारण्यात आला आहे. त्यामुळे नेरुळ सेक्टर-1 येथील शिवाजी चौकाचे रूपडे पालटले असून मावळ्यांच्या देखाव्याचे सर्वांना आकर्षण आहे. शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे काम वेगाने होत असून येथील सर्व कामांसाठी जवळजवळ 1.06 कोटीपेक्षा अधिकचा खर्च करण्यात येत आहे. यामध्ये 65 लाखांपेक्षा अधिकचा खर्च चौकाच्या सुशोभीकरणावर करण्यात आला असून शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यासाठी जवळजवळ 35 लाखांचा खर्च येणार आहे. यापूर्वी मुंबई शहरात वाशी येथील शिवाजी चौक परिसरास आकर्षक असे रूप देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकाची आगळी ओळख निर्माण झालेली असताना दुसरीकडे नेरुळ सेक्टर-1 येथील शिवाजी चौकातही 35 लाख खर्चातून मेघडंबरीमध्ये शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा उभारला जाणार आहे.
नेरुळ येथे असलेल्या गोलाकार चौकाची सर्व बाजूंनी रुंदी कमी केली गेली आहे. त्यामुळे सुरळीतपणे वाहतूक होण्यासही मदत होत आहे. याच परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच डॉ.डी वाय पाटील स्टेडियम असल्याने या परिसराला अधिकच आकर्षक रूप येणार आहे. आतापर्यंत चौकाला शिवाजी चौक असे नाव होते, पण चौकात असलेल्या देखण्या मेघडंबरीत मात्र पुस्तकप्रतिमा साकारली होती. परंतु आता सिंहासनारूढ पुतळा उभारला जात आहे. या ठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे देवनाथ म्हात्रे यांनी केली होती. नवी मुंबई नियोजित शहर असून या शहराला आकर्षक व देखणे रूप देण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
नेरुळ येथील शिवाजी चौकात पालिकेच्या वतीने काम करण्यात येत असून मेघडंबरीत शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे. त्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. चौकाच्या सुशोभीकरणासाठी जवळजवळ 71 लाख व पुतळ्यासाठी सुमारे 35 लाखांचा खर्च करण्यात येत आहे. चौकातील सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai