महिलांची तेजस्विनी लवकरच येणार

नवी मुंबई ः महिला स्पेशल बस सुरू करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी सरकारने घेतला होता. तेजस्विनी उपक्रमांतर्गत नवी मुंबई परिवहन उपक्रमानेही या बससाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली होती. बसखरेदीसाठीचा प्रस्ताव परिवहनच्या सभेत मंजूरही करण्यात आला होता. त्यानुसार आता या बस खरेदीचे सोपस्कार पार पडले असून महिनाभरात या बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये चालक व वाहक ही महिलाच असणार आहेत. 

शिक्षण आणि कामानिमित्त बसने प्रवास करणार्‍या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र बसमधील वाढत्या प्रवासीसंख्येमुळे धक्के खातच त्यांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे फक्त माहिलांसाठी बस सुरू झाल्या तर त्याचा फायदा सर्व महिला प्रवाशांना होणार आहे. या आधी दोन वेळा नवी मुंबईत परिवहनने महिला स्पेशल बस सुरू करण्याचा प्रयोग केला होता, मात्र तो यशस्वी होऊ शकला नव्हता. त्यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने या बस बंद कराव्या लागल्या. मात्र आता महिला प्रवाशांची संख्या वाढत असल्याने या बसना चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा परिवहनला आहे. कार्यालयीन वेळेत या बस महिलांसाठी आणि इतर वेळेत सर्वसामान्यांसाठी चालवण्याचा विचारही परीवहन करत आहे. या बससाठी वाहक आणि चालकही महिला असल्याने सध्या दोन महिला चालकांना घणसोली आगारात प्रशिक्षण दिले जात आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यातील पाहिली बस येणार आहे, इतर बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.