शिरवणे शाळेत ‘नई तालीम’ दिवस उत्साहात

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगर पालिका शाळा क्रमांक 15 शिरवणे येथे अनुभवाधारित मुलोद्योगी शिक्षण विषयक  विविध उपक्रम राबवून लालबहादूर शास्त्री जयंती तसेच गांधी जयंती नई तालीम दिवस म्हणून उत्साहात संपन्न झाली.

 केंद्रप्रमुख आत्माराम मिरकुटे, मुख्याध्यापिका युगंधरा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवणे गाव व परिसरात जनजागृतीपर फेरी काढण्यात आली. यात घोषणा, फलक व गीतगायनाद्वारे वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छ नवी मुंबई, टाकाऊ वस्तूपासून टिकावू वस्तू बनविणे या विषयी जन जागृती करण्यात आली. या जनजागृती फेरीत 1200 विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

यावेळी शालेय स्तरावर स्वच्छता या विषयावर वादविवाद स्पर्धा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री या विषयावर चित्रकला स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा तसेच दैनंदिन वापरातील वस्तू या विषयी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी  शिक्षकांनीही वैष्णव जनतो, रघुपती राघव राजाराम ही भजने गावून बापूजींना आगळीवेगळी मान वंदना दिली. विद्यार्थ्यांना मुलोद्योगाच्या माध्यमा तून शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन्ही संकल्पना एकाच वेळी समजाव्यात हाच या उपक्रमाचा उद्देश्य असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका युगंधरा ठाकूर यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले.