राष्ट्रवादीकडून मूक आंदोलनातून सरकारचा निषेध

नवी मुंबई ः केवळ आश्‍वासनांचा पाउस पाडून विकासाची कोणतीही कामे न करता जनतेचे जीणे खडतर करणार्‍या राज्य आणि केंद्रामधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मंगळवारी देशभर मूक आंदोलन करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळजळीत निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील शिवाजी चौकात नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मौनव्रत धरणे धरण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या विचारातून शांततामय पध्दतीने सरकारविरोधातील जनतेच्या मनातील आक्रोश या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.

आमदार संदीप नाईक यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवत हे सरकार केवळ मागील सरकारने केलेल्या विकास कामांवर स्वतःचे लेबल चिटकवत असल्याचे सांगितले. जनतेला प्रचंड यातना होत आहेत. शेतमालाला भाव नाही, बेरोजगारी वाढली आहे,  शेतकरी आत्महत्या करत आहेत, व्यापार, उद्योग सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट सुरु आहे असे टीकास्त्र सोडून जनतेच्या हिताची कोणतीही धोरणे नसलेल्या सरकारला जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी देखील सरकारचा बुरखा फाडून भाजपा सरकारने मागील चार वर्षात केवळ फसविण्याचेच काम केल्याचे म्हटले. सरकारकडे विकासाची कोणतीच धोरणे नाहीत. खोटे बोला मात्र रेटून बोला, हेच या लुटारु सरकारचे काम आहे. देशात महागाई गगनाला भिडली आहे असे संांगून आता जनताच या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले.