Breaking News
नवी मुंबई ः मुंबईच्या धर्तीवर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीदृस येथे गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही सूचना केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नऊ झोन समाविष्ट आहेत. यात ऐरोली, बेलापूर, दहिसर मोरी, दिघा, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, तुर्भे आणि वाशी यांचा समावेश आहे. पालिकेला मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय झाला तर या भागात 500 चौरस फुटांच्या मालमत्ताधारकांना याचा लाभ मिळणार आहे. मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या आढावा बैठकीत सांगितले. या बैठकीला आमदार गणेश नाईक. आ. मंदा म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन, नवी मुंबई पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर आधी उपस्थित होते.
दरम्यान, बारवी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना ज्याप्रमाणए कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करुन घेतले त्याच धर्तीवर नवी मुंबई पालिका व सिडकोमध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, सिडकोतर्फे आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी नागरिकांसाठी अभय योजना राबवावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. ऐरोली-काटई उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने येण्या-जाण्यासाठी मार्ग, पामबीच-घणसोली ऐरोली रस्त्याचे कामासह मतदारसंघाती विविध समस्या सोडवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai