अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरीला फटका

नवी मुंबई ः महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरीच्या पिकाला बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत 100 क्रेट माल एपीएमसीत कमी आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीच्या हंगामाला सुरुवात होते. यंदा हंगाम सुरू होतानाच पाऊस पडल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. भिजलेली स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत असल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 300 ते 400 क्रेट स्ट्रॉबेरी दाखल झाली होती, परंतु आता 200 ते 250 क्रेटच दाखल झाल्या असून तोही भिजलेला माल आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात अधिक प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जाते. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हा हंगाम असतो.

घाऊक बाजारात पाव किलो स्ट्रॉबेरीला 150 ते 250 रुपये तर प्रतिकिलोला 600 ते 1000 रुपये भाव आहे. उशिरा लागवड केलेल्या पिकाचे उत्पादन डिसेंबर महिन्यात येईल.

अंजिरावरही परिणाम

अंजीर फळाचाही हंगाम सुरू असून त्यावरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. सध्या एपीएमसी बाजारात पुरंदर, सासवड, वेल्हा येथून 4 ते 5 टेम्पो अंजीर दाखल होत असून 4 डझनला 200 ते 350 रुपये बाजारभाव आहे.