सेंट्रल पार्कला उद्घाटनाची प्रतीक्षा

नवी मुंबई ः उद्यानांचे शहर असलेल्या नवी मुंबईत 17 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन उभारलेले एक मोठे उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. घणसोली येथील सावली गाव स्थलांतर करून पालिकेने 39 हजार 135 चौ.मी. क्षेत्रफळावर हे सुसज्ज असे सेंट्रल पार्क उभारले आहे. मात्र, त्या गावाचे पुनर्वसन न केल्याने उद्घाटन करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. 

नवी मुंबई शहरात लहान-मोठी दोनशे उद्याने आहेत. नागरिकांच्या पसंतीस उतरलेले वंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई यांच्या पंक्तीत उतरणारे सेंट्रल पार्क घणसोलीत उभारले आहे. बहुतेक उद्यानांमध्ये मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनेक ठिकाणी ओपन जिम ही संकल्पना राबवली आहे. या उद्यानातही जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, मिनी फुटबॉल टर्फ, आकर्षक मानवी पुतळे आदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांसह तरुणांसाठीही ते आकर्षण ठरणार आहे.

घणसोली सेक्टर 3 येथे 16 ऑगस्ट 2014 पासून याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र त्याजागी आधी वसलेल्या सावलीगाव येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसन मागणीमुळे काम रखडले होते. कामाला एकूण 17 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात आले असून ते पूर्ण तयार झाले आहे. मात्र, ग्रामस्थांचे सिडकोने पुनर्वसन करावे त्यांनतरच पार्कची उभारणी करावी, अशी सावली ग्रामस्थांची आजही मागणी आहे. उद्घाटनप्रसंगी विरोध होऊ नये यासाठी उद्घाटन केले जात नसल्याचे सुत्रांनी सांगितले.