निसर्ग उद्यानात ओपन जीम

नवी मुंबई ः आमदार संदीप नाईक यांच्या आमदारनिधीतून बसविण्यात आलेल्या कोपरखैरणे सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानातील ओपन जीमचे गत श्ाुक्रवारी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

पूर्वी ज्या ठिकाणी डंम्पिंग ग्राउंड होते त्या जागेवर आता निसर्ग उद्यान फुलले आहे. या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी, फेरफटका मारण्यासाठी तसेच विरंगुळयासाठी दररोज शेकडो नागरिक येत असतात. नगरसेवक हांडे-पाटील आणि नागरिकांकडून या ठिकाणी ओपन जीम बसविण्याची मागणी करण्यात आली होती. आ.नाईक यांनी ही मागणी मान्य केल्यानंतर या निसर्ग उद्यानात ओपन जीमची निर्मिती करुन तीचे उदघाटनही करण्यात आले. उदघाटनानंतर पत्रकारांशी बोलताना आ. नाईक यांनी सांगितले की, निसर्ग उद्यानात योगा सेंटर, बॅडमिंटन कोर्ट, अधिक चांगला जॉगींग ट्रॅक अशा अनेक सुविधांची मागणी नगरसेवक हांडे-पाटील यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे. या संबधी महापौर जयवंत सुतार तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून या उद्यानात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देवू. निसर्ग उद्यान हा आपल्यासाठी निर्माण करण्यात आलेला उपक्रम असून त्याची आपलेपणाने जपणूक करण्याचे आवाहन नाईक यांनी कोपरखैरणे वासियांना केले. 

ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्रासाठी 15 लाखांचा आमदारनिधी

ओपन जीमच्या उदघाटनप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनी कोपरखैरणेतील ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी दिली. निसर्ग उद्यानात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा आमदार विकास निधी देण्याची घोषणा केली.