50 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसीकरण

नवी मुंबई ः 27 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात सुरु झालेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या जनजागृती व मोहिमपुर्व अंमलबजावणीत नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाचे मानांकन लाभले असून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील शाळांमधील मोहिमेतही नवी मुंबई महानगरपालिकेने तीन दिवसात 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना सुनियोजित पध्दतीने लसीकरण करून उत्तम कामगिरी केली आहे. मुंबई मंडळ आरोग्य सेवेच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी आज वाशीतील सेंट ऑगस्टीन आणि सेंट मेरी स्कुल येथील लसीकरण मोहिमेची बालरोगतज्ज्ञांसह पाहणी करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाची प्रशंसा केली.     

फादर ग्नेल स्कुल वाशी, डॉन बॉस्को स्कुल सेक्टर 42 नेरुळ, नॉर्थ पॉँईंट स्कुल सेक्टर 6 कोपरखैरणे व सेंट मेरी स्कुल सेक्टर 9 कोपरखैरणे अशा शाळांमध्ये सकाळ व दुपारच्या दोन्ही सत्रात लसीकरण करण्यात आले. गोवर रूबेला लसीकरणापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 9 महिने ते 15 वर्षे वयाचे एकही बालक वंचित राहू नये याकरिता सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून एकदा लस घेतली असेल तरीही अधिकचे संरक्षण म्हणून पुन्हा लस घ्यावी असे पालकांना आवाहन करण्यात येत आहे.