ई कचरा संकलन व व्यवस्थापनविषयी मार्गदर्शन

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2019 ला सामोरे जाताना आपण ई कच-याची सुयोग्य विल्हेवाट लावण्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने ई कचरा संकलन व विल्हेवाट व्यवस्थापन सुनियोजित पध्दतीने करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3142 संस्थेच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ई कचरा व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी ई वेस्टच्या दुष्परिणामांबाबत काळजी घेण्याची गरज व्यक्त करीत महानगरपालिकेला सर्व नागरिकांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.  

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार यांनी आज शहरे विकसित होत असताना ई वेस्टच्या प्रमाणातही वाढ होत आहे त्यामुळे इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनीक्स वस्तूंच्या ई कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान जगातील सर्वच शहरांपुढे उभे असून नवी मुंबई महानगरपालिका त्यादृष्टीने गांभिर्याने विचार करीत आहे व त्याकरीता या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

पर्यावरण विघातक असा वापरात नसलेल्या घऱ, कार्यालय येथील इलेक्ट्रानिक्स व इलेक्ट्रिकल वस्तूंचा कचरा हा मानवासह संपूर्ण प्राणी जीवनाला घातक असून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगत रोटरी क्लबच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका ई-कच-याबाबत जनजागृती करण्यासाठी जे काम करेल त्यात रोटरी क्लबचे संपूर्ण सहकार्य असेल असे केदारनाथ घोरपडे यांनी सांगितले.

ई-कचरा म्हणजे संगणक, टिव्ही, फ्रिज, लॅपटॉप, ए.सी., मोबाईल फोन, कंप्रेसर, टेलिफोन, फॅक्स मशीन, इ.जी.बी.एक्स. मशीन, प्रिंटर, वॉशिंग मशीन, सी.डी., डिव्हिडी, फ्लॉपी, पेन ड्राईव्ह, टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, वायर, केबल, स्विच, एक्सरे फिल्म्स, पंखे अशा विविध प्रकारच्या इलेक्ट्रकल व इलेक्ट्रॉनीक्स वस्तू असून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणेबाबत श्री. विक्रांत गोरले यांनी माहितीप्रद मार्गदर्शन केले. नवनवीन इलेक्ट्रॉनीक्स वस्तू  वापरण्यास मोह टाळून जास्तीत जास्त काळ योग्य प्रकारे इलेक्ट्रॉनीक्स व इलेक्ट्रीकल वस्तूंचा वापर करावा असेही त्यांनी आवाहन केले.