बाजार समिती विधेयक तुर्तास मागे

शुकशुकाटानंतर एपीएमसी पुर्वपदावर 

नवी मुंबई : सरकारचा पणन कायद्यात बदल करणारा अध्यादेश बाजार समित्यांच्या मुळावर उठल्याने पणन विभाग, कामगार विभाग व शासन निर्णयास स्थगिती द्यावी, माथाडी व सुरक्षा कामगार व व्यापारी वर्गांच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रश्‍नांची सरकारने सोडवणूक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी, हमाल व सुरक्षा रक्षक कामगार व व्यापारी वर्गाने 27 नोव्हेंबरला बंद पुकारला होता. बंद बेमुदत चालु ठेवल्याने 28 नोव्हेंबरला सरकारने बाजार समिती विधेयक तुर्तास मागे घेतले. त्यामुळे माथाडींच्या आंदोलनाला यश आले असून दोन दिवसांच्या शुकशुकाटानंतर एपीएमसी पुर्वपदावर आली आहे.  

बाजारसमित्या नियमन मुक्त केल्याने, व्यापारी, माथाडी यांच्याबरोबर शेतकर्‍यांचे देखील नुकसान होत होते. शासनाने दोन लाखांच्या आतील रोखीने व्यवहार करण्यास निर्बंध घातल्याने शेतकरी आणि अडते यांना त्रास होईल त्याचप्रमाणे अडत आठ रुपयांवरून सहा रुपयांवर आणली. याआधी देखील फळे-भाजीपाला नियमन मुक्त करून शासनाने शेतकर्‍यांना आपला माल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा दिली. प्रत्यक्षात मात्र शेतकरी थेट माल विक्रीस पाठवत नाही. व्यापार्‍यांच्यामार्फत आजही माल मार्केटमध्ये येत आहे. यात 30 टक्के माल शेतकर्‍यांचा तर 70 टक्के माल हा व्यापार्‍यांचा आहे. यामुळे नियमन मुक्त केले असले तरी याचा फायदा शेतकर्‍यांना मिळत नाही. उलट बाजार समितीत पाठवलेला शेतकर्‍यांचा माल हा ग्राहकावीणा पडून राहतो. फळे - भाजीपाला प्रमाणे दाणा आणि मसाला मार्केट देखील नियमन मुक्त केल्याने याचा थेट परिणाम व्यापारावर होत आहे, असा आरोप व्यापार्‍यांनी केला होता. विक्रीव्यवस्थेतील सेवांसाठी 6 ऐवजी 8 टक्के शुल्क आकारण्याबाबतचा बदल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने 25 सप्टेंबरला काढलेला अध्यादेश व 27 नोव्हेंबरला मंजूर केलेल्या विधेयकाच्या विरोधात माथाडी कामगारांनी राज्यव्यापी बंद पुकारला. त्यामुळे सरकारने हे विधेयक तात्पुरते मागे घेऊन अभ्यास करणार असल्याचे सांगितले. तसेच यासाठी समिती गठित करुन व्यापारी, माथाडी, शेतकरी यांनी अडचण येणार नाही असा नवीन कायदा बनवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे माथाडी कामगारांनी बंद मागे घेतला.  

बॉक्स

शासनाने अध्यादेश मागे घेतल्यानंतर धान्य मार्केटमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये 10 हजारपेक्षा जास्त उपस्थिती होती. व्यापारी प्रतिनिधी अशोक बढीया यांनी सर्वांनी संघटितपणे लढा दिल्यामुळे यश मिळाले असल्याचे स्पष्ट केले. पाचही मार्केटमधील सर्व घटकांनी एकीचे दर्शन घडविल्यामुळे त्याची दखल शासनाला घ्यावी लागली. यापुढेही सर्वांनी एकी कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

बॉक्स

दोन दिवस बाजारातील व्यवहार बंद असल्याने कलिंगड, पपई, संत्री, मोसंबी आदी फळे सडल्याने अक्षरश: उकिरडयावर फेकून देण्यात आली. शेतकरी व वाहतूकदारांचा 80 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भाजीपाला बाजारातही रताळे, आले, काकडी, वांगी, भोपळा, सुरण मोठया प्रमाणात शिल्लक राहिले होते. यामध्ये भोपळ्याला मोठा फटका बसला होता. कांदाबटाटा बाजारातही 100 गाडया माल शिल्लक होता. त्यातील 50 गाडया बाजाराच्या आवारातच उभ्या होत्या.

...............................................