सोसायटी, शाळांसह रुग्णालयातही स्वच्छता स्पर्धा

नवी मुंबई ः‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अनेक स्वच्छता विषयक उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकसहभाग असावा तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याच्या अनुषंगाने माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोसायटी, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल, प्रभाग अशा 5 गटांकरिता स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. 

रहिवाश्यांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे त्याचप्रमाणे या विषयीच्या कार्यवाहीत सातत्य ठेवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्वच्छता स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा (खाजगी शाळा गट व नमुंमपा शाळा गट असे 2 गट), स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ गृहनिर्माण संस्था व स्वच्छ प्रभाग (शहरी क्षेत्रातील प्रभाग, गांवठाण भागातील प्रभाग व झोपटपट्टी क्षेत्रातील प्रभाग असे 3 गट) याप्रमाणे प्रमुख पाच गट असणार आहेत. या स्पर्धेच्या गुणांकनाकरिता निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचर्‍यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा इत्यादी बाबींवर भर देण्यात आलेला आहे. सदर स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या संस्था, समुहांनी 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत संबंधित महानगरपालिका विभाग कार्यालयात अर्ज करावयाचा आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष स्थळपरीक्षण व गुणांकन 11 ते 24 डिसेंबर, 2018 या कालावधीत करण्यात येणार आहे.

बॉक्स

विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.25 हजार, रु.15 हजार व रु.10 हजार असे रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे. स्वच्छ शाळा स्पर्धेतील खाजगी शाळा व महानगरपालिका शाळा अशा दोन्ही गटांतील प्रथम व व्दितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.15 हजार व रु.10 हजार रोख पारितोषिक हे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यासह प्रदान करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.1 एक लक्ष, व्दितीय क्रमांकास रु.75 हजार आणि तृतीय क्रमांकास रु.50 हजार रोख रक्कमेचे पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांच्यासह प्रदान करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या दोन्ही गटांतील प्रथम व व्दितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु. 25 हजार व रु. 20 हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे. स्वच्छता स्पर्धेतील स्वच्छ हॉटेल, स्वच्छ हॉस्पिटल व स्वच्छ प्रभाग या तीन गटांतील प्रथम व व्दितीय विजेत्या संस्थांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.