डॉ. अमर द्विवेदी यांना वैद्यकीय पुरस्कार जाहिर फोटो

नवी मुंबई : पुण्यातील वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत वैद्यकीय पुरस्कार नवी मुंबईतील डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेदीक महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. अमर द्विवेदी यांना जाहीर झाला आहे. आयुर्वेद संशोधन क्षेत्रामध्ये डॉ.द्वीवेदी यांनी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहिर झाला असून येत्या 6 जानेवारी रोजी पुण्यातील एरवंडणा येथील धन्वंतरी सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान  या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  

पुण्यातील प्रसिद्ध वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य करणाऱया व्यक्तींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी देखील संस्थेच्या पुरस्कार समितीने विविध पुरस्कारांची घोषणा केली असून मुंबईतील वैद्य शंकर पांडुरंग किंजवडेकर यांची महर्षि अण्णासाहेब पटर्वधन वैद्यकीय पुरस्कार 2018 साठी निवड केली आहे. तसेच नवी मुंबईतील डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेदीक महाविद्यालयातील सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ.अमर द्विवेदी यांना वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रूत पुरस्कार जाहिर झाला आहे. डॉ.द्विवेदी हे गेल्या 15 वर्षापासून आयुर्वेद क्षेत्रात  कार्यरत असून त्यांनी आयुर्वेदात अध्यापन आणि शल्यतंत्रात केलेल्या संशोधनासाठी त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित असलेला हा पुरस्कार देण्यात येत आहे. डॉ.अमर द्विवेदी हे नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेदीक महाविद्यालयात उपप्राचार्य तसेच  रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या वतीने इतर पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.