Breaking News
स्वातंत्र्यदिनी पालिकेची नवी संकल्पना
नवी मुंबई ः नवी मुंबई हा स्वच्छतेचा ब्रँड झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आपले स्वच्छताकर्मी, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे तसेच उत्साही नागरिक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपण रहात असलेल्या इमारतीच्या दोन्ही बाजूच्या दोन इमारती आणि आपल्या परिसरातील स्वच्छतेवर काटेकोर लक्ष द्यावे व शहर स्वच्छतेत सक्रिय सहभागी होत ‘स्वच्छतेला योगदान देणारा कर्मचारी' व्हावे अशी नवी संकल्पना मांडली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘माझी माती माझा देश' अभियानात भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023' अंतर्गत आयोजित ‘स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री' या विशेष कार्यक्रमामध्ये आयुक्त राजेश नार्वेकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक येथील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे वाढला. त्यामुळे आपली जबाबदारीही वाढली. ही जबाबदारी पेलण्यासाठी आपण सारे सक्षम आहोत याची जाणीव ठेवूनच आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता कार्याची नोंद त्यांच्या सीआर मध्ये घेतली जाईल अशीही संकल्पना मांडली. त्याचप्रमाणे स्वच्छता विषयक नवनवीन कामे करताना विविध प्रकारे विचार मंथन केले जाते, मात्र त्याच त्याच मंडळींनी विचार केल्याने त्यामध्ये तोचतोचपणा येण्याचा धोका लक्षात घेत यामध्ये काही नवीन संकल्पना मांडल्या जाव्यात याकरिता महानगरपालिका मुख्यालयातील तळमजल्यावर सूचनापेटी ठेवण्याचे आयुक्तांनी जाहीर केले. या सूचनापेटीत 30 ऑगस्टपर्यंत महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच नागरिकांनीही स्वच्छतेविषयी आपल्या काही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात अशीही एक वेगळी संकल्पना आयुक्तांनी यावेळी अभिव्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र स्वच्छतेमध्ये योगदान देणाऱ्या 16 दैनंदिन समग्र साफसफाई कामातील पर्यवेक्षक आणि शौचालय सफाई कामातील पर्यवेक्षक यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित या विशेष कार्यक्रमात नमुंमपा शाळा क्र. 6, करावे येथील विद्यार्थी समुहाने राष्ट्रभक्तीपर समूहगीत तसेच दृष्टी अमोल मेचकर या गायिकेने देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात स्वररंग मिसळला. ‘सदैव स्वच्छ ठेवू आपला देश, माझी माती माझा देश' हा संदेश प्रसारित करणारे आरंभ क्रिएशनच्या कलावंतांनी सादर केलेले नृत्यनाट्य उपस्थितांची दाद मिळवून गेले. भारत सरकारच्या आदेशानुसार स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ यावेळी ग्रहण करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai