विमानतळ पुनर्वसन व पुनःस्थापना परिसराची पाहणी

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला विकासकामांचा आढावा  

नवी मुंबई ः आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरीत होणार्‍या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे. यापैकी 272 प्रकल्पबाधितांनी सदर भूखंडांवर बांधकाम करण्यास सुरूवातदेखील केली आहे. याचा आढावा घेण्यासाठी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पुष्पक नोड आणि पुनर्वसन व पुनःस्थापना पॉकेट्सला भेट दिली.

या परिसरातील विकासकामे वेगाने सुरू असून सिडकोतर्फे सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शाळा, नागरी आरोग्य केंद्र व समाजमंदिर यांसारख्या सामाजिक सुविधादेखील या परिसरात पुरवण्यात आल्या आहेत. याशिवाय महिला भवन, अंगणवाडी, प्रशासकीय भवन व स्मशानभूमी या सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. या परिसरात उदयास येणारी वसाहत 222 हेक्टरवर विस्तारलेली असून सर्व प्रकारच्या भौतिक व सामाजिक सुविधांनी स्वयंपूर्ण असणार आहे. सदर विकासकामे जवळजवळ पूर्ण झाली असून मार्च 2018 पर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुष्पक नगर येथे उभारण्यात येत असलेल्यासांडपाणी प्रक्रीया केंद्र व इतर विकासकामांचा लोकेश चंद्र यांनी आढावा घेतला. 

प्रकल्पबाधितांनी त्यांना प्राप्त झालेल्या भूखंडांवर ज्या प्रमाणात बांधकाम करायला सुरूवात केली आहे त्यावरून हे एक सर्व सोयी सुविधांनी युक्त, नियोजनबद्ध व स्वयंपूर्ण असे नगर निर्माण होणार यात शंका नाही. त्याचबरोबर विमानतळ प्रकल्पाचे कामदेखील वेगाने सुरू असून सभोवतालच्या परिसराचा कायापालट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पाला जेव्हा मूर्त स्वरूप प्राप्त होईल तेव्हा तर सभोतालच्या परिसरासोबतच प्रकल्पबाधितांच्या या नगरालादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप प्राप्त होईल.