अटल करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये

पनवेल ः रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या या पाचव्या स्पर्धेची अंतिम फेरी 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. 

अटल करंडक एकांकिका स्पर्धा ही संयोजन समितीचे विश्वस्त माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. अंतिम फेरीत 25 एकांकिका दाखल झाल्या असून, त्यांचे प्रयोग तीन दिवस सकाळी 9 ते रात्री 10 दरम्यान सादर होणार आहेत. विजेत्या एकांकिका आणि वैयक्तिक ठसा उमटवणार्‍या कलाकारांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या वेळी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धा संयोजन समितीचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे, खजिनदार अमोल खेर आणि सीकेटी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप यांनी केले आहे.