पनवेल तालुक्यात होणारे तीन नवे पूल

कामोठे : गावांची शहरे होऊन अनेक वर्षे उलटली, तरी गावात जाणारे मार्ग अरुंद असल्यामुळे पनवेल तालुक्यातील विचुंबे, देवद परिसरातील नागरिकांना प्रवासात मोठा अडथळा होता. त्यामुळे आ. प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात तीन वेगवेगळ्या कामांच्या निधीला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे हजारो नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी, 31 कोटी 25 लाखांचा निधी होणार खर्च.

सिडको वसाहत असलेल्या नवीन पनवेललाजवळ विचुंबे ग्रामपंचायत आहे. सिडको वसाहतीचा प्रशस्त रस्ता संपताच विचुंबे गावात प्रवेश करण्यासाठी गाढी नदीवर पूल आहे. मागील अनेक वर्षांपासूनच्या या पुलाचा वापर येथील नागरिक करीत आहेत. मात्र विचुंबे आणि उसर्ली भागात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या गृहसंकुलांमुळे मोठ्या प्रमाणात येथील रहिवासी संख्या वाढली. गाड्या वाढल्या, वर्दळ वाढली, मात्र 10 मीटरच्या या रस्त्यावरुन वाहतूक होते. या परिसरात शाळा, कॉलेज निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ आहे. ही वर्दळ लक्षात घेऊन आ. ठाकूर यांनी पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी केली होती. गाढी नदीवरील देवद गाव ते नवीन पनवेल या अरुंद पुलावरून तर चारचाकी वाहन जात नाही..

या भागातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. तसेच मुंबई-पुणे महामार्गावरून शिवकर गावात जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. आ. ठाकूर यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 25 कोटी 25 लाख, देवद गाव ते नवीन पनवेल जोडणार्‍या गाढी नदीवरील पुलास 3 कोटी आणि विचुंबे गाव ते नवीन पनवेलला जोडणार्‍या गाढी नदीवरील पुलास 3 कोटी असा एकूण तालुक्यातील कामांसाठी 31 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 नोव्हेंबर रोजी मंजूर केला आहे.