हिरा गु्रपचा गुंतवणुकदारांना दीड कोटींचा गंडा

कंपनीने 31 गुंतवणूकदारांना फसवले ः पोलीस कंपनी प्रमुखाच्या शोधात

नवी मुंबई ः हैदराबाद येथील हिरा गोल्ड एक्झिम लि. आणि हिरा ग्रुप ऑफ कंपनीने नवी मुंबईतील अनेक ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ नौहेरा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. नौहेरा शेख यांच्या हिरा गोल्ड एक्झिम लि. कंपनीने नवी मुंबईतील 31 ग्राहकांची तब्बल 1 कोटी 58 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली असून नौहेरा शेख सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.

नौहेरा शेख यांनी हैदराबाद येथे हिरा गोल्ड एक्झिम लि. आणि हिरा ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना करून मुस्लिम समाजातील महिलांसाठी गुंतवणुकीची योजना तयार केली होती. गुंतविलेल्या रकमेवर हमखास प्रतिमहिना परतावा रक्कम मिळवून देण्याचे आमिष त्यांनी आपल्या एजंटच्या माध्यमातून दाखविल्याने हैद्रराबादसह, महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई व इतर भागातील शेकडो मुस्लिम महिलांनी या कंपनीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला नौहेरा शेख यांनी गुंतवणूकदारांना काही महिने परतावादेखील दिला. मात्र सप्टेंबर 2018पासून त्यांनी गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केले. त्यामुळे नौहेरा शेख यांना प्रथम हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला.

नौहेरा शेख यांनी नेरुळमधील सेच्युरियन मॉलमध्ये हिरा गोल्ड एक्झिम कंपनीची शाखा सुरू केली होती. या शाखेच्या माध्यमातून कंपनीने नियुक्त केलेल्या मार्केटिंग मॅनेजर आणि एजंटने नवी मुंबईतील मुस्लिम महिलांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यामुळे नवी मुंबईतील अनेकांनी या कंपनीमध्ये लाखो रुपयांची रक्कम गुंतविली होती. मात्र त्यांनादेखील कंपनीने परतावा दिला नाही. त्यामुळे नवी मुंबईतील 31 गुंतवणूकदारांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या प्रकरणात नेरुळ पोलिस ठाण्यात गेल्या महिन्यामध्ये हिरा गोल्ड एक्झिम लि. आणि हिरा ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रमुख असलेल्या नौहेरा शेख तसेच कंपनीच्या नेरुळ शाखेचे मॅनेजिंग डायरेक्टर मुबारक शेख, जनरल मॅनेजर मॉली थॉमस, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अजिजा जुवाले, मार्केटिंग मॅनेजर अख्तर मोदक आणि एजंट मुदस्सर आणि डॉ. रिझवान शेख या सर्वांविरोधात फसवणुकीसह अपहार त्याचप्रमाणे प्राइज चीट्स अ‍ॅण्ड मनी सर्क्युलेशन स्कीम (बॅनिंग) अ‍ॅक्ट तसेच एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने नौहेरा शेख यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून लवकरच नौहेरा शेखला ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली.