सिडकोकडून मरीना प्रकल्पाची पाहणी

नवी मुंबई ः सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या मरीना प्रकल्प स्थळाची पाहणी गुरुवारी केली. सी.बी.डी. बेलापूर येथील सेक्टर क्र. 11, 14 आणि 15 येथे मरीना प्रकल्प अर्थात सुसज्ज बंदर विकसित करण्यात येणार आहे. केरळमधील कोची इंटरनॅशनल मरीना नंतरचा देशातील हा अशा प्रकारचा दुसरा सुसज्ज जल वाहतूक प्रकल्प असणार आहे. 

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) सिडकोला एकूण 5 एकर जमिनीपैकी 3 एकर जमीन मरीना प्रकल्पाकरिता व 2 एकर वॉटर फ्रंट प्रकल्पांतर्गत जमीन बोट दुरुस्ती, फ्युएल स्टेशन, उपाहारगृह, विश्रामगृह, शौचालय इ. अन्य सुविधा विकसित करण्याकरिता देण्याची विनंती केली होती. सिडको संचालक मंडळाने 6 डिसेंबर 2017 रोजी सेक्टर- 15, सीबीडी बेलापूर येथील 7.25 एकर (अंदाजित) क्षेत्रफळाचा भूखंड रु. 1 या दराने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने मरीना प्रकल्प विकसित करण्याकरिता एमएमबीला देण्यास मंजुरी दिली. सिडकोच्या नियोजन विभागाकडून 7.25 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येणार्‍या मरीना आणि वॉटर फ्रंट प्रकल्पाच्या एकात्मिक विकासाकरिता बृहद् आराखडा तयार करण्यात आला असून 3 एकरवर मरीना आणि 4.25 एकरवर अन्य सेवा सुविधा विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. अन्य सेवा सुविधांमध्ये लॅन्डस्केप एरिआ, उद्यान, लहान मुलांसाठी  प्ले एरिआ, हरित क्षेत्र, व्ह्यूइंग गॅलरी, उपहारगृह, स्केटिंग रिंक, योगा शेड इ. सुविधा प्रस्तावित आहेत. सदर प्रकल्पाकरिता आवश्यक त्या वन वा पर्यावरणविषयक मंजुरी प्राप्त करण्याची तसेच प्रवासी जेट्टी उभारण्याची जबाबदारी ही एमएमबीची असेल.  

सदर प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शहरांतर्गत जल वाहतुकीला प्रोत्साहन देऊन सार्वजनिक वाहतुकीच्या अन्य साधनांवरील तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या गेटवे ऑफ इंडियासारख्या बंदरांवरील ताण कमी करणे हा आहे. अशा प्रकारच्या बंदरातून प्रवासी बोटींबरोबरच स्पीड बोट, क्रूझ यांचीही वाहतूक केली जाईल. याशिवाय या प्रकल्पांतर्गत उद्यान, अ‍ॅम्फी थेटर, मॅनग्रोव्ह वॉक, फुड प्लाझा, बोट राइड, गॅझेबो या सोयी सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत. 

सदर प्रकल्पामुळे नवी मुंबई व मुंबई दरम्यान प्रवासाचा एक नवीन, तुलनेने स्वस्त आणि वेळेची बचत करणारा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटन व अन्य पूरक व्यवसायांस चालना मिळून नवी मुंबईच्या आर्थिक विकासासही गती प्राप्त होईल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी यावेळी व्यक्त केला.