भूपेंद्र शहा लखोबा लोखंडेच्या भूमिकेत

नवी मुंबई : फसवणूक व बनावट शासकीय कागदपत्रे बनविल्याप्रकरणी रिगल हेबीटेट प्रा. लि. या कंपनीने न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून भूपेंद्र शहा यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार विक्रम भणगे व निवृत्त पोलीस महानिरीक्षक विजय चव्हाण यांनी वाशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लातूर येथून शेतकरी दाखला मिळवण्यासाठी एकाच इसमाने भुपेंद्र शहांच्या नावाने वेगवेगळे फोटो व सह्या करुन हा दाखला मिळवल्याचे सादरीकरण केले. परंतु या फसवणुकीचा पर्दाफाश जरी झाला असला तरी या लखोबा लोखंडेच्या भुमिकेत नक्की कोणता भुपेंद्र शहा वावरत होता याचा उलगडा न झाल्याने गुढ कायम आहे.   

भूपेंद्र शहा यांनी गव्हाण येथील सर महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारुन अलिम याच्याशी संगनमत करून 1995 मध्ये ट्रस्टची 80 एकर जागा केवळ 4 लाखांत विकत घेतल्याचा आरोप सदर तक्रारीत भणगे यांनी केला आहे. ही जमीन मिळवण्यासाठी भूपेंद्र शहा यांनी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील खुटेगाव येथून तहसीलदार कार्यालयातून बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे 2008 मध्ये सदर जमिनीची पनवेल येथे नोंदणी केली आहे. सदर जमिन नंतर त्यांनी ???? ला विकली आहे. 1995 च्या खरेदीखतात सर्व्हे क्रमांक 356/7 (अ) व 356/7 (ब) हे नमूद करण्यात आले असून पनवेल तहसीलदारांनी हरिभाऊ पाटील या कुळाने दाखल केलेल्या अपिलावर निर्णय देताना 2006 मध्ये त्याचे 357/7 चे 356/7 (अ) व 356/7 (ब) विभाजन केले असल्याने त्याचा समावेश 1995 च्या खरेदीखतात होऊ शकत नसल्याचा आरोप भणगे यांनी केला आहे. त्यामुळे हे खरेदीखतच बोगस असल्याची तक्रार विक्रम भणगे यांनी पोलीसांकडे केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष हारून अलिम यांनी इतर ट्रस्टींना अंधारात ठेवून हे विक्रिखत तयार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या विक्रिखतानंतर पुन्हा ट्रस्टच्या अध्यक्षांनी ??? यांना ही जमिन अशाचपद्धतीने विकली आहे. त्यामुळे रिगल हेबीटेट प्रा. लि. या कंपनीने न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीच्या आधारे न्हावा-शेवा पोलिसांनी भूपेंद्र शहा यांच्यासह महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारु न अलीम ए.आर.युसुफ, सुरेश शेडगे, बाज खान, रमेश भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पनवेल, लातूर आदी ठिकाणांहून सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर चौकशीअंती या गुन्ह्यातील आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल, असे परिमंडळ-2चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आपणाला अद्याप काहीही माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे भूपेंद्र शहा यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे.

सिडकोच्या 22.5 टक्के जमिनीवर डोळा

महम्मद युसुफ ट्रस्टची 80 एकर जमीन संपूर्ण दलदलीची व खारफुटीयुक्त असल्यामुळेच आपण ही जमीन चार लाख रुपयांत विकत असल्याचे ट्रस्टच्या ठरावात अध्यक्ष हारु न अलिम याने म्हटले आहे. त्यामुळे ही खारफुटीयुक्त जमीन आता सिडकोच्या घशात घालून सिडकोकडून साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत सुमारे 50 हजार चौ.मी. भूखंड प्राप्त करण्याचा डाव संबंधित भुपेंद्र शहा यांनी आखल्याचा आरोप तक्रादाराने केला आहे.