मुस्कानची यशस्वी सुरुवात

नवी मुंबई ः गत वर्षभरामध्ये बेपत्ता झालेल्या व पळवून नेण्यात आलेल्या अल्पवयीन मुला-मुलांची माहिती पोलिसांकडून नव्याने संकलीत करुन त्यांचा शोध घेण्यासाठी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत नवी मुंबई पोलीसांकडून राबवल्या जाणार्‍या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. यामध्ये पोलीसांनी  तीन अल्पवीयन मुलींचा शोध घेऊन अपहरणाचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

हरविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी संपुर्ण राज्यभरामध्ये ऑपरेशन मुस्कान महाराष्ट्र ही शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. 1 ते 31 डिसेंबर या महिन्याभरामध्ये ही शोध मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेदरम्यान हरविलेल्या व पळवून नेण्यात आलेल्या परंतु मिळून न आलेल्या मुला मुलींची माहिती नव्याने अद्ययावत व संकलित करण्यात येऊन त्यांचा नव्याने शोध घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यावर सिग्नलवर भिक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, तसेच धार्मिक स्थळ, रुग्णालय आदी ठिकाणी काम करणार्‍या अल्पवयीन मुलांना हरविलेली मुले समजुन त्यांचे फोटो व त्यांची संपुर्ण माहिती अद्ययावत तयार करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून या मोहिमेची प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली आहे. या कक्षाने खारघर मधून ऑक्टोबर 2016 मध्ये अपहरण झालेल्या मुलीचा पोलीसांनी सलग 16 तास शोध घेतला असता ही मुलगी नेरुळ येथील      (पान 7 वर)


करावे गावात असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी या मुलीच्या वडीलांसह करावे गावात तिचा फोटो दाखवून शोध घेतला असता 4 डिसेंबरला ही मुलगी पोलीसांना सापडली. तसेच नेरुळ येथून गत ऑक्टोबरमध्ये 16 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. एएचटीयुच्या पथकाने सदर घटनेतील संशयीत व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरुन तांत्रिक तपास करुन सदर मुलीचा शोध घेतला. ही मुलगी कर्नाटक राज्यात गुलबर्गा येथे असल्याचे पोलीसांना कळाले. एएचटीयुच्या पथकाने कर्नाटकमध्ये जाऊन सदर मुलीची सुटका केली. तसेच रबाले एमआयडीसी येथून 22 ऑक्टोबर रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आलेल्या 15 वर्षीय मुलीचा शोध घेताना सदर मुलीला सोलापुर येथे नेण्यात आल्याचे समजले. त्यामुळे एएचटीयुच्या पथकाने सोलापुर गाठले. परंतु पोलीसांचा सुगावा लागल्याने अपहरणकर्त्याने मुलीला पुन्हा नवी मुंबईत आणले. मात्र त्याच्या पाळतीवर असलेल्या एएचटीयुच्या पथकाने त्यांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले. नवी मुंबई पोलीसांनी मोहिमेच्या सुरुवातीलाच यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.