महाराष्ट्राचे विकासपर्व

महाविकास आघाडीचा शपथविधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह अन्य सहा मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई ः महाराष्ट्रात अखेर महाविकास आघाडी अवतरली असून राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली, त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, तर काँग्रसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी शपथ घेतली. हा शपथविधी शिवाजी पार्कवर संपन्न झाला असून महाआघाडीच्या लाखो कार्यकर्त्यांनी या सोहळयाला उपस्थिती लावली. 

राज्यात गेले महिनाभर चाललेल्या सत्तानाटयाला आता पूर्णविराम मिळाला असून शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात अखेर महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. काँग्रेसने या सरकारला पाठिंबा दिल्याने आता हे तीनही पक्ष समान कार्यक्रम तत्वावर काम करणार असून महाराष्ट्राला पाच वर्षाचे स्थीर सरकार देण्यासाठी वचनबध्द असल्याचे सांगितले आहे. ठाकरे घराण्यातील व्यक्ती उध्दव ठाकरे यांच्या रूपाने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. 

शपथविधी सोहळयानंतर झालेल्या पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत रायगडच्या संवर्धनासाठी 20 कोटी रूपयांचा निधी तत्काळ मंजुर करून आपल्या सरकारच्या शिवरायांप्रतिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर येत्या चार दिवसात शेतकर्‍यांसबंधीचा अहवाल तत्काळ सरकारला सादर करण्याचे आदेश देऊन येत्या काही दिवसात शेतकर्‍यांबाबत मोठा निर्णय महाआघाडी सरकार घेणार असल्याचे संकेत दिले. 

अजुन नव्या सरकारचा मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून त्यानंतरच खर्‍या अर्थाने महाविकास आघाडीचे काम सुरू होणार असल्याचे यावेळी ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शिवतीर्थावर झालेल्या या शपथविधी सोहळयाला देशातील अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी हजेरी लावल्याने शिवसेनेचे आता खर्‍या अर्थाने राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. 

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आव्हान

3राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महाआघाडी शेतकर्‍यांचा सातबारा कसा कोरा करणार याकडे विरोधक लक्ष देऊन आहेत. आधीच चार लाख कोटींवर कर्ज असणार्‍या महाराष्ट्र सरकारवर 60 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा या कर्जमाफीमुळे पडणार आहे. त्याबरोबर मेट्रो सारख्या प्रकल्पाला निधीही उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.

अजित पवारांच्या भुमिकेकडे लक्ष

शरद पवारांनी अजित पवारांचे बंड तूर्त शमविले असले तरी जोपर्यंत या महाआघाडीच्या सरकारचा विश्‍वास दर्शक ठराव पारित होत नाही तोपर्यंत सावध भुमिका घेण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. अजित पवार अजुनही बंडाच्या भुमिकेत असल्याचे बोलले जात असून वेळप्रसंगी पुन्हा दगा फटका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चीली जात आहे. त्यामुळे शरद पवार कशी पावले टाकतात याकडे राज्याचे लक्ष आहे. 

विधानसभा अध्यक्ष पदावरून घमासान

त्रिशंकु विधानसभा राज्यात अस्तित्वात आल्याने विधानसभा अध्यक्षांच्या पदाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सुरूवातीला काँग्रेस पक्षाला हे पद देण्याचे मान्य करणार्‍या राष्ट्रवादीने अखेर या पदावर दावा सांगितल्याने काँग्रेसने त्या बदल्यात राष्ट्रवादीकडून अतिरिक्त दोन मंत्रीपदांची मागणी पदरात पाडून घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रीपदी विराजमान 

गुरुवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. 

2उद्धव यांच्या स्वागतासाठी अवघे मंत्रालय एकवटले होते. आजपर्यंत इतरांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवणार्‍या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती स्वत: या पदावर येत असल्यानं मंत्रालयातील कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळंच उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी मोबाइल कॅमेर्‍यात टिपण्यासाठी मंत्रालयातील कर्मचार्‍यांची प्रचंड झुंबड उडाली होती. 

त्यांचा हा पदग्रहण सोहळाही कालच्या शपथविधी इतकाच संस्मरणीय ठरला. या निमित्तानं राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. सहाव्या मजल्यावर जाण्याआधी उद्धव यांनी तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते सहाव्या मजल्यावर गेले. मुख्यमंत्री कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर उद्धव यांनी पदभार स्वीकारला.


आज मांडणार विश्‍वासदर्शक ठराव, उद्या बहुमत चाचणी

 नव्या ठाकरे सरकारसाठी बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. त्याआधी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सर्व पक्षांचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्यामुळे त्यांना लवकर मोकळे करता यावे यासाठी आजच ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा नव्या सरकाचा प्रयत्न आहे. 

 आज आणि उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात येणार आहे. सर्व आमदारांचा 27 तारखेला शपथविधी झाला आहे. त्यामुळे आता केवळ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया बाकी आहे.