घरवापसीची नाईक गोटात चिंता

शशिकांत शिंदे व प्रशांत पाटलांचा बैठकांचा सपाटा

नवी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन झाले असून, चार महिन्यांवर असलेली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आक्रमकपणे लढण्याचे संकेत महाविकास आघाडीकडून मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे व प्रशांत पाटली यांना या निवडणुकीची रणनीती आखण्याचे आदेश अजित पवारांनी दिले असून, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ची साद या दोघांनी नगरसेवकांना घातली आहे. त्यामुळे किती नगरसेवक गणेश नाईकांची साथ सोडतात, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांना पालिका निवडणुकीत धडा शिकविण्याचा विडा चिडलेल्या अजित पवार यांनी उचलला आहे. त्या दृष्टीने त्यांनी पालिका निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सरकार महाविकास आघाडीचे असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा मानस शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांचा असून त्या दृष्टीने राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा परत येण्याचे आवाहन सर्वांनीच केले आहे. यामध्ये नगरसेवक रवींद्र इथापे, सुरेश कुलकर्णी, प्रकाश मोरे, देवीदास हांडे-पाटील, अंजली वाळुंज, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, संगिता बोर्‍हाडे, जयाजी नाथ अशा अनेक नगरसेवकांच्या भूमिकेकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. 111 नगरसेवक असलेल्या नवी मुंबई महापालिकेत सध्या राष्ट्रवादीचे 53 नगरसेवक असून त्यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. गणेश नाईक भाजपात गेल्यावर भाजपच्या सहा नगरसेवकांनी त्यांना साथ दिली. शिवाय काँग्रेसच्या दशरथ भगतांनीही भाजपात प्रवेश करून गणेश नाईकांची ताकद नवी मुंबईत वाढविली. 

परंतु राज्याच्या राजकारणाचे फासे उलटे पडल्याने गणेश नाईकांसह भाजपात गेलेल्या अनेकांची राजकीय गणिते चुकली आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्याने राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले नगरसेवक पुरते गोंधळून गेले आहेत. त्यातच राष्ट्रवादी सोडल्याने अजित पवारांनी प्रचंड नाराजी गणेश नाईकांविरुद्ध व्यक्त केली असून, गेले 30 वर्षे महापालिकेत अजेय राहिलेल्या नाईकांना धडा शिकविण्याचे मनोगत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत चांगलेच रंग भरले  जाणार असून  भाजपच्या रणनीतीवर नाईकांचे पालिकेतील अस्तित्व अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. 

शिवसेनेने पालिकेची सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे संकेत दिले असून, त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच मंडणगड येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे शिबिर झाले असून त्यामध्ये हा विचार व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सरकार स्थापनेत गुंतले असल्याने त्यांच्या शिक्कामोर्तबानंतर नवी मुंबईतील राजकीय घटना वेग घेतील हे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे व प्रशांत पाटलांनी याबाबत बैठकांचा सपाटा नवी मुंबईत लावला असून सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक संस्थाच्या पदाधिकार्‍यांशी ते चर्चा करत आहेत. येणारी पालिका निवडणूक ही नाईक गोटाला निकाराची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सरकार स्थापनेनंतरच याचे चित्र स्पष्ट होईल.