Breaking News
पनवेल : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे 2024 मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे या दृष्टीने तयारी करा, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उलवे येथे केले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड मधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या सदर सोहळ्याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, नवनिर्वाचित सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना येणाऱ्या काळात पक्षाची ताकद आणखी वाढवायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने सक्रिय राहणे आवश्यक आहे, असे ना. रवींद्र चव्हाण म्हणाले. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचा कायापालट केला. आज ते जगात सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, तर भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस मोठे मन दाखवून कार्यरत आहेत.भाजपाची विचारसरणीच मी नव्हे; तर आम्ही अशी आहे. म्हणून आपला पक्ष मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशाच प्रकारे एकजुटीने आणि नेटाने काम करीत राहिलो तर येणाऱ्या सर्व निवडणुका आपण जिंकू, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यवत केला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai