नुकसानग्रस्त शेतकर्‍यासाठी सेनेचा मोर्चा

पनवेल : अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, पीक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व संपूर्ण कर्जमाफी अंतर्गत शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी पनवेल तहसील कार्यालयावर शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी मोर्चा काढला व पनवेल तहसीलदारांना निवेदन दिले. राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकजयांकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. राज्यपालांनी तुटपुंजी मदत जाहीर करू शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शिवसेनेने आपल्या निवेदनात केला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. याचा सामना करण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पनवेल तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकार्‍यांमार्फत नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संबंधित सर्वेक्षणात वेळ वाया न घालवता शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती घोषित करून हेक्टरी 25 हजार रुपये तसेच मच्छिमारांना नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात येण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

शेतकरी, मच्छीमारांची उरण तहसीलवर धडक

अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम, संपूर्ण कर्जमाफी, अंतर्गत शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी, पिकांना व फळबागांना हेक्टरी 25000/- रुपये तसेच मच्छीमारांनाही नुकसान भरपाईसह नवीन बोटी बांधण्यास आर्थिक मदत म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी उरण तहसील कार्यालयावर सेनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात बहुसंखेने उरण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक बहुसंख्येने सहभागी होते.