शुद्धमधासाठी बी सिटी प्रकल्प

पनवेल : औषधी असणारी शुद्ध मध शहरी भागात फारच तुरळक प्रमाणात पाहायला मिळते. मधमाशी पालन हे मुख्यत्वे ग्रामीण भागात केले जाते.  मात्र खारघर शहरात देशातील पहिला बी सीटी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आलेल्या मधमाशांच्या पेट्या आपल्या गच्चीवर अथवा गार्डन परिसरात लावून शुद्ध मधाची निर्मिती करता येणार आहे. 

मधाचे औषधी गुणधर्म मोठे आहे. मात्र भारतात मधमाशी पालनाचे प्रमाण खूप कमी आहे. शहरीकरणामुळे शुध्द मध मिळणेही दुर्मिळ झाले आहे. बाजारात मिळणारे मधही भेसळयुक्त असल्याने खारघर शहरातील डॉ युवराज कागीणकर यांनी, बी सिटी प्रकल्प राबविण्याची योजना आखली आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या सेक्टर 5 मधील डोंगरमाथ्याच्या परिसरात कागीणकर यांनी, मधमाशा पालनासाठी 25 पेट्या लावल्या आहेत. बी सिटी (मधमाशांचे शहर) हे संकल्पना मुख्यत्वे करून अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आदींसह मोठ्या प्रमाणात युरोपात राबविली जाते. भारतात मधमाशी पालनाबाबत जनजागृती नाही. डॉ कागीणकर यांनी याकरिता पुढाकार घेतला असून शहरातील रहिवाशी आपल्या घरी, गच्चीवर गार्डनमध्ये अशाप्रकारे मधमाशा पालन करून शुद्ध मधाचे उत्पादन करू शकतात. त्यासाठी लागणार्‍या पेटीची योग्य रित्या निगा राखल्यास महिनाभरात एका किलोच्या आसपास शुद्ध मध मिळू शकेल. शहरी भागात शुद्ध मधाच्या नावाखाली भेसळयुक्त मधाची विक्री केली जाते. त्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. सफरचंद, बदाम, कांद्याच्या उत्पादनात मधमाशांची भूमिका महत्त्वाची असते. संबंधीत ठिकाणी मधमाशांचा वावर नसेल तर हे उत्पादन योग्य रित्या होऊ शकणार नसल्याचे डॉ युवराज कागीणकर यांनी सांगितले.