577 झाडांची होणार कत्तल

वृक्षतोडीवर एकच हरकत ः केवळ 109 झाडांचे पुनर्रोपण करणार

नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात अडथळा ठरणारा दक्षिणेकडील बंबाची पाडा आणि वरचा ओवळा हद्दीतील एक डोंगर हटविण्यात येणार आहे. मात्र, या डोंगरावर जवळपास 577 जुनी झाडे आहेत. ही झाडे तोडण्यापूर्वी सिडकोच्या उद्यान विभागाच्या वतीने नागरिकांना हरकती, सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु केवळ एकच हरकत दाखल झाली आहे. यावर सुनावणी झाली असून पायथ्याला असलेल्या 109 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असून 577 झाडांची कत्तल होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सिडकोच्या हद्दीतील विमानतळ भाग-6 या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासकामात ही टेकडी उभी आहे. ती हटवून त्यावरील 577 झाडांवर कुर्‍हाड चालवली जाणार आहे. ही झाडे तोडण्याची परवानगी सिडकोच्या उद्यान विभागाकडे मागण्यात आली. मात्र, परवानगी देण्याआधी महाराष्ट्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 अन्वये कुणाच्या काही हरकती असतील किंवा काही सूचना असतील, तर त्या नागरिकांनी सिडकोकडे कळवाव्यात, असे आवाहन सिडकोने केले होते. त्यानुसार नवी मुंबईतून फक्त एकच हरकत घेण्यात आली. अनार्जित चौहान यांनी ही हरकत नोंदवली. चौहान यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. इतकी झाडे तोडून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्रोपण करावे, अशी मागणी या वेळी त्यांनी सिडकोकडे केली. मात्र, पुनर्रोपण करणे सहज शक्य नसल्याचे त्यांना सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. हा डोंगर अत्यंत जुना आहे. तिथे अनेक जुने वृक्ष आहेत. तरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झाडांचे पुनर्रोपण शक्य असून वर असलेल्या झाडांपर्यंत जेसीबी पोहोचणे शक्य नाही, असे उद्यान विभागाच्या वतीने त्यांना सांगण्यात आले. झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी माती आणि मुळासकट तो भाग उचलावा लागणार आहे. त्यामुळे डोंगराच्या वरच्या भागापर्यंत पोहोचणे शक्य नाही. पायथ्याला असलेली 109 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

नवी मुंबईत अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक संघटना आहेत. ज्या लहान-सहान गोष्टींसाठी नेहमी पुढे येत असतात. मात्र, इतक्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीबाबत साधी हरकत घेण्यासाठीही कुणी आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात सिडकोच्या उद्यान अधिकारी गीता सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही एकच हरकत नोंदवली गेली असल्याचे सांगितले. त्यानुसार या विषयावर सुनावणी झाली असून त्याचा अहवाल काही दिवसांत संबंधित विभागाला दिला जाईल आणि मग झाडांवरील पुढची कारवाई सुरू होईल, असे स्पष्ट केले.