इलेक्ट्रिक बसच्या फेर्‍या वाढणार

नवी मुंबई : पर्यावरणपूरक अशा 30 इलेक्ट्रिक बस सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बस सध्या नवी मुंबईतील तीन प्रवासी मार्गांवर सेवा देत आहेत; पण या नंतर या बसची सेवा नवी मुंबईतील इतर काही मार्गांवर सुरू केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत या बसच्या फेर्‍या मुंबईतही सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

केंद्र सरकारच्या फेम योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 30 बस इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणार्‍या आहेत. त्यामुळे या बसपासून कोणतेही प्रदूषण होत नाही आणि इंधनाचीही बचत होते. आतापर्यंत 30 बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सध्या या बस तीन मार्गांवर चालवल्या जात आहेत. घणसोली ते वाशी या मार्गावर 9 क्रमांकाची बस, 105 क्रमांकाची बस बेलापूर ते वांद्रे, घणसोली ते नेरुळ सेक्टर-48 यादरम्यान 20 क्रमांकाची बस चालवली जात आहे. आता एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या एकूण 30 बसपैकी 25 बसची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. इतर गाड्यांची नोंदणी येत्या काही दिवसांत होणे अपेक्षित आहे. या गाड्या चार्जिंगवर चालणार असल्याने चार्जिंग स्टेशन उभारणे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानुसार सध्या तुर्भे बस आगारात दोन चार्जिंग स्टेशन उभारले गेले आहेत. इतर दोन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम प्रस्तावित आहे. शिवाय तुर्भे बस आगाराबरोबर आसूडगाव बस आगारातही एक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, त्याचबरोबर वाशी रेल्वे स्थानक बस आगार आणि सीबीडी बस आगारामध्ये सध्या या बसचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

तुर्भे बस आगारात बाहेरच्या दिशेने हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यातून बाहेरील इतर खासगी गाड्यांनाही चार्जिंग स्टेशनची सुविधा देऊन त्यातून उत्त्पन्न मिळविण्याचा एनएमएमटीचा मानस आहे. एक गाडी चार्जिंग होण्यासाठी 45 ते 60 मिनिटांचा अवधी लागतो. त्यातून 220 कि.मी. इतके अंतर बस गाठू शकते. मात्र, सध्या या चार्जिंगवर 120 ते 160 कि.मी. इतकेच अंतरावर बस चालवली जात आहे. गाडी रिझर्व्हला आली की, ती परत चार्जिंगसाठी आगारात आणली जात आहे.