अभ्यासिका, ग्रंथालयांना कर्मचारी मिळणार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विभागांत सुरू करण्यात येत असलेल्या ग्रंथालय व अभ्यासिकांसाठी कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नियुक्त करण्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर मे. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर स्कील डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एम्प्लॉमेंट ट्रेनिंग यांच्याकडून कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून असलेली नगरसेवकांची मागणी पूर्ण होणार आहे. 

सिडकोकडून समाजोपयोगी कामासाठी महापालिकेला दहा शहरांत विविध ठिकाणी भूखंड दिले आहेत. त्यात रुग्णालय, समाजमंदिर, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका आदी सेवांचा समावेश आहे. यातून महापालिकेने सुमारे 30 भूखंडांवर समाजमंदिरासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारती बांधून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तरी या इमारतींचा वापर केला जात नसल्याने या इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीवरही महापालिकेला मोठा खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, बांधकाम पूर्ण झालेल्या जवळपास आठ इमारतींमध्ये महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने सुरू करण्यात येणार्‍या अभ्यासिका व ग्रंथालयांसाठी ग्रंथपाल व अन्य कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यास आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर समाज विकास विभागाने खासगी संस्था महिला मंडळ यांच्याकडून अनुभवी कर्मचारी पुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत समाज विकास विभागाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी मे. इंडियन इन्स्टिट्यूशन फॉर स्कील डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग या संस्थेकडून ग्रंथालय व अभ्यासिकांसाठी 16 कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या उपायुक्त क्रांती पाटील यांनी दिली.