उपायुक्तांविरोधात महापालिकेवर मोर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2019
- 934
जाणूनबुजून वारंवार बदल्या केल्याचा आरोप
पनवेल ः वर्षातून चार वेळा केल्या गेलेल्या बदल्या, उर्दू विषय नसतानाही उर्दू माध्यमात विद्यार्थ्यांना शिकविण्याची सक्ती करण्याचा आरोप करून पनवेल महापालिका शाळेतील शिक्षिका ज्योत्स्ना भरडा यांच्यासाठी महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. पनवेल महापालिकेच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चा बेकायदा असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
पनवेल महापालिकेच्या शाळा क्रमांक 4 मध्ये शिक्षिका म्हणून काम करणार्या ज्योत्स्ना भरडा यांनी पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याविरोधात तक्रारअर्ज केला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडून माझा छळ होत असल्याचा आरोप संबंधित महिलेकडून करण्यात आला. वर्षातून चार वेळा बदली करण्यात आली असून उर्दू माध्यमात शिकविणे जमत नसतानाही जाणीवपूर्वक उर्दू माध्यमात शिकवा, अशी सक्ती केली जात असल्याचा आरोप जोत्स्ना भरडा यांनी लेखी पत्रात केला होता. महिनाभरापूर्वी दिलेल्या पत्रावर कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे सांगत भरडा यांनी सोमवारी मोर्चा काढला.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौक, महात्मा गांधी मार्गावरून मोर्चा पनवेल महापालिकेवर धडकला. शिक्षक संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष अर्जुन कोळी यांनी महापालिकेसमोर मोर्चाला संबोधित करताना उपायुक्त जमीर लेंगरकर यांच्यावर जबाबदार अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करावी, अशी मागणी केली. विविध पदाधिकार्यांनी लेंगरेकर यांच्यावर टीका करीत न्याय मिळाला नाही, तर भविष्यात मंत्रालयावर महाराष्ट्रातील शिक्षकांचा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला. या मोर्चात ज्योत्स्ना भरडा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. महापालिका आयुक्त गणेश देशमुख महापालिकेत उपस्थित नसल्यामुळे प्रभारी उपायुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली. पनवेल महापालिकेने मात्र भरडा यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास नकार दिला. संबंधित प्रकरणाची चौकशी भरडा यांच्या मागणीनुसार सुरू असताना यावर बोलणे योग्य नसल्याचे प्रभारी उपायुक्त संजय शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. चौकशीत जे समोर येईल त्यावरून महापालिका आयुक्त कारवाईचा योग्य निर्णय घेतील, मात्र त्यापूर्वीच याविषयी बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
शिक्षण विभागातील अधिकार्यांनी केलेला भ्रष्टाचाराची चौकशी उपायुक्त म्हणून मी सुरू केली आहे. शिक्षकांकडून शिक्षणाच्या गुणवत्तेची अपेक्षा केली, याबाबत विचारणा केली म्हणून माझ्याविरोधात केले गेलेले हे षडयंत्र आहे, परंतु मी अशा आरोपांना घाबरत नसून चौकशीत तथ्य समोर येईल. मी जे काही केले आहे, ते कायद्यानुसार केले आहे. त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai