पनवेलमधील आदिवासींना अमृत आहार

गर्भवती महिला, 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना मिळणार लाभ

पनवेल : आदिवासी भागातील गर्भवती महिला आणि बालकांचे कुपोषण टळावे, या हेतूने राज्य सरकारने डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा विस्तार केला आहे. यापूर्वी आदिवासी तालुक्यात राबविली जाणारी अमृत आहार योजना आता पनवेलमधील आदिवासींसाठीदेखील राबविली जाणार आहे. सोमवारी पनवेल पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली.

ग्रामीण भागात राहणार्‍या आदिवासी गर्भवती, स्तनदा मातांना चांगला आहार देऊन जन्माला येणार्‍या बाळाला आणि सात महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना आहार देऊन कुपोषण टळावे, असा या योजनेचा हेतू आहे. या योजनेत अंगणवाड्यांमध्ये दिल्या जाणार्‍या आहारासोबत विशेष आहार म्हणून सात महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना आठवड्यातून चार दिवस अंडी किंवा केळी दिली जाणार आहेत, तर गर्भवती आणि स्तनदा मातांना आठवड्यातून सहा दिवस एकवेळचा चौरस आहार म्हणून सोमवार ते शनिवारी सहा दिवस अंडी, केळी, चपाती, दोन भाज्या आणि वरण भात दिला जाणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा आहार दिला जाणार आहे. एकात्मिक बालविकास सेवायोजना 2 मधील 23 अंगणवाड्यांच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. या सर्व अंगणावाड्यांमध्ये 88 गर्भवती माता, 108 स्तनदा माता, सात महिने ते सहा वर्षांच्या 937 बालकांचा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर यापूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ मिळत नव्हता. राज्य सरकारने या योजनेचा यंदा विस्तार केल्यानंतर पनवेल तालुक्याचादेखील समावेश झाल्यामुळे निधी उपलब्ध होताच पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे यांनी योजनेचा लाभ लाभार्थींना देण्यास सुरुवात केली. राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशांतून आदिवासींना चांगला आहार मिळावा, यासाठी चांगल्या प्रतीचा आहार बनवून द्यावा, अशा सूचना संबंधित अंगणवाडी सेविकांना दिल्या असल्याची माहिती देण्यात आली. पनवेल तालुक्यातील धामणी या ठिकाणी औपचारिक कार्यक्रम घेऊन पनवेल तालुक्यातील या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.