घणसोली ते ऐरोली खाडी पुलाचे बांधकाम रखडले

नवी मुंबई : पामबीच मार्गावर घणसोली ते ऐरोली दरम्यान खाडी पुलाच्या बांधकामासाठी 50 टक्के रक्कम देण्याचे सिडकोने यापूर्वी मान्य केले होते. हा निधी गृहीत धरून 298 कोटी 99 लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मांडला होता; परंतु गेल्या आठवड्यात 125 कोटी रुपये काम झाल्यावर देण्याचे पत्र सिडकोने दिले आहे. यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव स्थगित केला आहे. 

घणसोली ते ऐरोली खाडीपूल सिडकोने बांधणे अपेक्षित होते; परंतु खारफुटीचा अडथळा आल्यामुळे ते वेळेत होऊ शकले नाही. 14 डिसेंबर 2016 मध्ये हा नोड महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आला. यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधांची जबाबदारीही महापालिकेवर आली आहे. घणसोली ते ऐरोली दरम्यान 1.95 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. महापालिकेने पामबीच रोडवर केबल स्टे ब्रीज बांधण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. या पुलासाठी जवळपास 800 कोटी रुपये खर्च लागणार असल्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला. केबल स्टेऐवजी सर्वसाधारणत: बांधतात, त्या पद्धतीने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामध्ये खारफुटी असल्यामुळे वन व पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. पालिकेने त्यांच्या पॅनेलवरील सल्लागाराकडून ढोबळ अंदाजपत्रक तयार केले आहे. साधारणत: 298 कोटी 99 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यामधील विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता. पामबीच रोडवर पूल बांधण्यासाठी सिडकोनेही निधी द्यावा, यासाठी महापालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे. 15 जुलै 2019 मध्ये याविषयी बैठकही झाली होती. त्या बैठकीमध्ये 50 टक्के खर्च देण्यास सिडको प्रशासनाने सहमती दर्शविली होती. काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाणार होता; परंतु गेल्या आठवड्यात सिडकोने महापालिका प्रशासनाला पत्र देऊन या पुलाच्या कामासाठी 125 कोटी रुपयेच देण्याची तयारी दर्शविली असून ही रक्कमही काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे सुरेंद्र पाटील यांनी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले.