पोलिसांची तिजोरी झाली मालामाल

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिलेल्या सशुल्क सुविधांच्या माध्यमातून त्यांच्या तिजोरीत 13 कोटी 29 लाख रुपयांची भर पडली आहे. विदेशी नागरिकांची नोंदणी, चारित्र पडताळणी यासह सभा व अतिक्रमणाला पुरवलेल्या बंदोबस्तांसाठी पुरवलेल्या पोलीस संरक्षण यासाठी आकारलेल्या शुल्कातून कोट्यवधी जमा झाले आहेत. 

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षात अनेक मोठ्या राजकीय सभा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. त्याशिवाय लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत इतर धार्मिक कार्यक्रमही झाले. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पुरवण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यानुसार गतवर्षात अनेक खासगी समारंभांना पोलिसांनी सशुल्क बंदोबस्त पुरवला होता. पालिका व सिडकोच्या अतिक्रमण विरोधी कारवाईंनाही आवश्यकतेनुसार बंदोबस्त पुरवला जातो. गतवर्षात एकूण 317 कारवाईंना पोलिसांनी बंदोबस्त पुरवला होता. त्यापैकी 89 कारवाई सिडकोमार्फत होत्या, तर 228 कारवाई पालिकेच्या माध्यमातून केल्या होत्या. त्याद्वारे गतवर्षात नऊ कोटी 34 लाख 88 हजार 341 रुपयांचे शुल्क पोलिसांनी आकारले आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या परवान्यांच्या नूतनीकरणाद्वारे दोन कोटी 20 लाख 816 रुपये प्राप्त झाले आहेत. नागरिकांचा चारित्र पडताळणी अहवालही सशुल्क दिला जातो.