Breaking News
अबकी बार 45 पार ठरणार दिवास्वप्नच
मुंबई ः मोदींच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपाने अबकी बार 45 पार चा नारा दिला आहे. परंतु, शिंदे-पवार गटाने उभ्या केलेल्या 19 उमेदवारांना निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे अबकी बार 45 पार चा भाजपचा नारा दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता आहे.
2019च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेना युतीसोबत भाजपला 41 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या तीन वर्षात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडून दोन्ही गटातील मोठ्या नेत्यांना सत्तेत सहभागी करुन महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवली. या दोन्ही पक्षांच्या भरोशावर भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 45 पारचा नारा दिला आहे. भाजपने जरी 45 पारचा नारा दिला असला तरी भाजपच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा खुप कमी जागा आल्याने त्यांना 28 पैकी 28 जागा निवडून आणणे सध्याचे राजकीय वातावरण पाहता अशक्य आहे. त्यातच शिंदे गटाच्या वाट्याला 15 जागा जरी आल्या असल्या तरी त्यांना राज्यात 5 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंनी जरी शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबत 40 आमदार व 12 खासदार मिळवले असले तरी मतदार शिवसैनिक आणि सहानभुतीची प्रचंड लाट मात्र उद्धव ठाकरेंसोबत असल्याने महाराष्ट्रात महायुतीला यावेळी म्हणावा तसा प्रतिसाद जनतेकडून मिळत असल्याचे दिसत नाही.
यावेळी विरोधकांनी जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसारखे ज्वलंत विषय निवडणुकीच्या प्रचारात लावून धरले आहेत. याउलट महायुती मोदींची गॅरेंटी घेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, गेल्या तीन वर्षात राज्यात झालेले सत्तांतर आणि भ्रष्टाचारी लोकांसोबत भाजपने स्थापलेली सत्ता याबाबत प्रचंड जनआक्रोश जनतेत असून त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल असे बोलले जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेले मतदान हे अपेक्षेपेक्षा कमी आहे. वास्तविक पाहता, कमी झालेले मतदान हे सत्ताधाऱ्यांसाठी फायद्याचे असल्याचे बोलले जाते. परंतु यावेळी विरोधकांच्या सकारात्मक प्रचारामुळे भाजपचा मतदार मतदानासाठी बाहेर पडला नसल्याचे राजकीय समिक्षकांचे मत आहे. त्यामुळे यावेळची महाविकास आघाडी आणि महायुतीतील लढाई बरोबरीची असल्याचे बोलले जात असून भाजपला राज्यात 24 ते 27 जागा मिळतील अशी चर्चा आहे. असे झाल्यास मोदींच्या हॅट्रिकला मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai