जमिनीच्या वादावरुन दोघांच्या हत्येचा प्रयत्न

पनवेल: पूर्व नियोजित कट रचून जमिनीच्या वादातून कौटुंबिक सदस्यांनीच  दोघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला चढविला. त्यात सामजिक कार्यकर्ते सचिन सखाराम पाटील व दत्तात्रेय सखाराम पाटील हे बंधू गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार उपजिल्हा रुग्णालयात केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आह.

बुधवारी तालुक्यातील वाजे गावात लक्ष्मण पाटील व त्यांची मुले अजित पाटील, अजय पाटील, अपेक्ष पाटील तसेच वनिता लक्ष्मण पाटील व अश्विनी पाटील आदींनी सचिन व दत्ता यांच्या मातोश्रींना शिव्या द्यायला सुरुवात केली. सचिन आणि दत्ता कामावर जाण्यासाठी बाहेर पडत असताना भांडण सोडवण्यासाठी गेले, तोच बाजूला लपवून ठेवलेली तलवार आणि लोखंडी सलई, लाकडी दांडा काढून सचिन आणि दत्तात्रेय पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केले. त्यात ते दोघेही गंभीररित्या जखमी झाले. दत्ताच्या डोक्यात दोन ठिकाणी गंभीर घाव घालून हाताची बोटंही मोडली आहेत. सचिनच्या डोक्यावर तीन ठिकाणी वार करून त्याच्या पायालाही दुखापत केली आहे.

त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघा बंधूंना ग्रामस्थ व नातेवाईकांनी गाडीत घालून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉ. आशुतोष आणि डॉ. करले आदींनी उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत यांनी गुन्ह्याप्रकरणी तातडीने लक्ष देवून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील कारोटे यांना पंचनामा करण्यासाठी निर्देश दिले. शिवाय नेरे विभागाचे पोलिस उपनिरीक्षक नितीन बडगुजर यांनी आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. उद्या त्यांना पनवेल उपजिल्हा सत्र न्यायलयात हजर करणार आहेत.