भाजी मार्केटचे पावसाळी शेड बनले धोकादायक

नवी मुंबई : वाशीमधील भाजी मार्केटमध्ये बांधलेल्या तात्पुरत्या पावसाळी शेडचे बांबू अनेक ठिकाणी तुटले आहेत, त्यामुळे धोकादायक बनलेले शेड केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.  

नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील बस डेपो ते सेक्रेड हार्ट या मार्गाच्या बाजूला असलेला नाला बांधकाम करून बंदिस्त केला आहे. शिव-विष्णू मंदिराच्या मागील बाजूला बंदिस्त केलेल्या नाल्यावर सेक्टर 9 मधील भाजी मार्केटचे पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी सुमारे 100 भाजी व फळविक्रेते व्यवसाय करतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी तात्पुरते शेड उभे करण्यात आले होते. आता या शेडचे अनेक बांबू ठिकठिकाणी तुटलेले असून ते कोसळण्याची शक्यता आहे. येथील विक्रेत्यांनी शेड पडू नये म्हणून त्यास बाहेरच्या बाजूने लोखंडी पाइपने आधार दिला आहे. या ठिकाणी भाजी व फळे खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांची संख्या अधिक असते. येथील विक्रेते तसेच ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.