Breaking News
नवी मुंबई ः उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 434 शाळा असून त्यामध्ये नवी मुंबई पालिकेच्या 57 प्राथमिक तसेच 23 माध्यमिक शाळा आहेत. महापालिका क्षेत्रातील काही सीबीएससी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार याआधीच सुरू झालेल्या आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली अत्यंत उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या विद्यार्थ्यांनी शाळेकडील ढोल-ताशे व लेझीम साहित्याचा उपयोग करून नवीन विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत केले. फुलांच्या पाकळ्या उधळून नृत्य करत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गापर्यंत नेण्यात आले. याप्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी अरूणा यादव, शिक्षण विस्तार अधिकारी सुलभा बारघारे व केंद्र समन्वयक तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक, शिक्षणप्रेमी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल, चॉकलेट व गोड खाऊ देण्यात आला. नमुंमपा शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. काही शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणही करण्यात आले.
नवी मुंबईतील आजपासून सुरू होणाऱ्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, पालकांप्रमाणेच शिक्षकांनीही अत्यंत उत्साहाने हा प्रवेशोत्सव साजरा केला. या माध्यमातून खाजगी शाळांप्रमाणेच नवी मुंबई पालिकेच्या शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची आनंदाने सुरूवात करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai