Breaking News
नवी मुंबई ः नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फादर्स डे निमित्त निसर्गाविषयी आपली आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी बेलापूर येथील पारसिक हिल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर विभाग कार्यालय आणि नेरूळच्या एस.के.कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणशील उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपस्थित नमुंमपा अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतामित्र तसेच एनएसएसचे विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिकांनी पारसिक हिल परिसरात पडलेला प्लास्टिक, कागद आदी कचरा गोळा करून पारसिक हिल परिसराची स्वच्छता केली तसेच या ठिकाणी फळे-फुले देणाऱ्या नवी मुंबईच्या जैवविविधता वाढीसाठी पोषक झाडांचे वृक्षारोपण करून माझी वसुंधरा अभियानाची सामुहिक शपथही ग्रहण करण्यात आली.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमध्ये पर्यावरणशील व स्वच्छतापूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांत लोकसहभाग असावा याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून यामध्ये सुट्टीच्या दिवशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्साही सहभाग लाभत आहे. त्या अनुषंगाने पारसिक हिल परिसरात अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा उपक्रम राबवला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना घनकचरा व्यवस्थापनामधील घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण करणे व हा वर्गीकृत कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंट्यागाड्यात देणे याचे महत्त्व पटवून देण्यात आले व त्यानुसार कृती करण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेप्रमाणेच यावेळी पारसिक हिल परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai