महापौर चषकातील स्पर्धा लांबल्या

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाजया महापौर चषका अंतर्गत स्पर्धांना उशीर होत असल्यामुळे यंदा काही स्पर्धांना कात्री लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि परिक्षांचा कालावधी जवळ आल्याने सर्व स्पर्धा वेळेत होण्याची शक्यता धूसर झाली आहे. शहरातील खेळाडू या स्पर्धांच्या प्रतिक्षेत आहेत. 

नवी मुंंबई महानगरपालिका युवकांच्या क्रीडा-कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा विभागाच्या माध्यमातून महापौर चषकाच्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करते. सुमारे 20 ते 25 क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात येतात. यामध्ये कब्बड्डी, क्रिकेट, जलतरण, खो-खो, शूटिंग बॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बुद्धीबळ, मॅरेथॉन, कॅरम, कुस्ती क्रिकेट, तायक्वाँदो इत्यादी विविध प्रकारांचा समावेश आहे. दरवर्षी साधारत: या स्पर्धा डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जातात. परंतू, यंदा आत्तापर्यंत फक्त चारच स्पर्धा पार पडल्या आहेत. इतर स्पर्धांचे भवितव्य अधांतरीच आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून एप्रिल, मे दरम्यान त्या पार पडतील. विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा कालावधी सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत असतो. दरम्यान, या कालावधीत स्पर्धा आयोजित केल्या तर स्पर्धकांची वाणवा भासेल. त्यामुळे स्पर्धा पार पाडणे महापालिकेला जिकरीचे ठरेल. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर उर्वरित स्पर्धा होण्याची धूसर आहे. एकंदरीत स्पर्धांना होणारा वेळ पाहता शहरातील खेळाडूंनी याबाबत संताप व्यक्त केला असून स्पर्धा लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे. 

कोट

काही कारणास्तव स्पर्धा घेण्यास विलंब झाला असला तरी दरवर्षी घेण्यात येणार्‍या सर्व स्पर्धा निर्धारित वेळेत घेतल्या जातील. आचारसंहितेचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. किंबहुना या स्पर्धांमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची अडवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

कोट

विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा जवळ आल्या असल्याने स्पर्धा निर्धारित वेळेतच घेणे आवश्यक आहे. स्पर्धाना उशीर झाल्यास स्पर्धकांअभावी स्पर्धा खेळावल्या जातील का याबाबत संभ्रम आहे. 

- अजय घाटगे, पालक