Breaking News
नवी मुंबई ः सन 2024-2025 वर्षातील पहिल्या सहामाहीची मालमत्ता कर देयके भरण्याचा अखेरचा दिनांक 30 जून रोजी रविवार असल्याने व त्यापूर्वीही 29 जून रोजी शनिवारची कार्यालयीन सुट्टी असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात येऊन करभरणा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालयातील तसेच बँकांमधील करसंकलन केंद्रे शनिवार 29 जून व रविवार 30 जून रोजी सुरु ठेवण्यात आली होती.
नागरिकांना सुट्टीच्या दिवशी ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शनिवारी 29 जून रोजी 5 कोटी 83 लक्ष व रविवार 30 जून रोजी 4 कोटी 36 लक्ष अशा प्रकारे दोन दिवसात 10 कोटी 19 लक्ष इतकी मालमत्ता कर रक्कम जमा झालेली आहे. याकरीता मालमत्ता कर विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपआयुक्त शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली दोन्ही दिवस करसंकलनासाठी कार्यालयात उपस्थित होते. सुट्टीच्या दिवशी केंद्रे सुरु ठेवल्याने नोकरी-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झालीच शिवाय महानगरपालिकेच्या महसूलातही लक्षणीय भर पडली.
नागरिकांकडून मिळत असलेल्या सातत्यपूर्ण प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेला नेहमीच गती मिळालेली आहे. मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा मोठा स्त्रोत असून मालमत्ता करापोटी जमा होणारी रक्कम ही दर्जेदार नागरी सेवासुविधा पूर्तीसाठी वापरली जात आहे. त्यामुळे 30 जून पर्यत पहिल्या सहामाहीचा मालमत्ता कर भरणा करायचे राहून गेलेल्या नवी मुंबईकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून शहराच्या प्रगतीत आपले अनमोल योगदान दयावे असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai