कारचोराला उत्तर प्रदेशमधून अटक

नवी मुंबई : पनवेल भागातून अल्टो गाडी चोरून पळून गेलेल्या चोरट्याला उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथून अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. हुसेन आरिफ साजीद हुसेन (42) असे या चोराचे नाव असून तो मौलानाचा वेश धारण करून गाझियाबादमध्ये राहत असल्याचे आढळून आले.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी हुसेन आरिफ साजीद हा कल्याणमध्ये राहण्यास होता. डिसेंबरमध्ये त्याने पनवेल भागातून अल्टो गाडी चोरून पलायन केले. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी या चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याची माहिती घेतली असता, आरोपी हुसेन आरिफ हा उत्तर प्रदेश भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गाझियाबाद येथे गेलेल्या पोलिसांच्या पथकाने आरोपी हुसेन आरिफ याला सोमवारी चोरीच्या अल्टो गाडीसह ताब्यात घेतले. त्याला पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

वहुसेन पनवेल येथून अल्टो गाडी घेऊन उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद येथे अल्टो गाडीतच झोपत असल्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात खोपोली, खडकपाडा व तळोजा या भागात घरफोडी व मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती परिमंडळ-2चे पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने केली.