31 जानेवारीपर्यंतची मतदारयादी धरणार गृहित

फेब्रुवारीपासून नोंदणी करणारे मताधिकारापासून राहणार वंचित

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने केवळ 31 जानेवारीपर्यंतच नोंदणी झालेल्या मतदारांची नावे ग्राह्य धरली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 31 जानेवारीनंतर नावाची नोंदणी करणार्‍या हजारो नव आणि स्थलांतरीत मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत. 

नवी मुंबई पालिकाक्षेत्रात बेलापूर आणि ऐरोली या दोन विधानसभा क्षेत्रांचा भाग आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदारयादी आणि नव्याने 31 जानेवारीपर्यंत तयार करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे 31 जानेवारीनंतर होणार्‍या नोंदणीची दखल आयोगाला यादीत घेता येणार नाही. नवी मुंबई महापालिकेत बेलापूर मतदारसंघात सुमारे तीन लाख 85 हजार, तर ऐरोली मतदारसंघात चार लाख 74 मतदार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या मतदारयाद्यांची प्रभागनिहाय विभागणीचे काम करावे लागते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून 31 जानेवारीपर्यंत अस्तित्वातील मतदारयादीच ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे सध्या शहरभर सुरू असलेली मतदारनोंदणी ही पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. 

निवडणूक आयोगाच्या 31 जानेवारी 2020च्या पत्रानुसार निश्चित  झालेले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी हे पत्र दिले आहे. तर भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार विशेष मतदार नावनोंदणीसाठी विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. त्याची अंतिम यादी ही 5 मे 2020 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतू या 31 जानेवारी 2020 नंतर करण्यात आलेल्या मतदारनोंदणीचा उपयोग पालिका निवडणुकीसाठी होणार नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीपासून शहरातील हजारो नवमतदार आणि स्थलांतरीत मतदार वंचित राहणार आहेत.