पश्चिम महाराष्ट्र महोत्सव 2020 चे आयोजन

नवी मुंबई ः 14 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2020 दरम्यान नवी मुंबईतील सानपाडा येथे झाशीची रानी मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व जनविकास प्रबोधिनी यांच्या सयुंक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र महोत्सव 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. 

महाराष्ट्रात नवी मुंबईमध्येच फक्त असा पश्चिम महाराष्ट्र महोत्सव घेण्यात येतो. या महोत्सवात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील वस्त्र, खाद्य, नृत्य, संगीत, कला व संस्कृतीचा प्रचार व्हावा, त्याचबरोबर नवी मुंबईकरांना पश्चिम महाराष्ट्राची ओळख व्हावी, यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे आयोजक गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या महोत्सवात प्रामुख्याने काही गोष्टी आकर्षणाचे केंद्रबिंदू असतील, जसे कुस्त्यांचे जंगी सामने, शाहिरी लोकरंग, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापूर चादरी, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मिसळ, सातारचे कंदी पेढे, पुणेरी मिसळ, झुणका भाकर आणि इतर खास आकर्षणे. दहा दिवस चालणार्‍या या महोत्सवात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने नारदीय भजन-कीर्तन, ओव्या, भारुड, पोवाडे, शिवव्याख्यान, लावणी, खेळ पैठणीचा, लोकनृत्य, हळदीकुंकू समारंभ यांचा समावेश असेल. महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील नैपुण्यपूर्ण कामगिरी करणार्‍या लोकांना पश्चिम महाराष्ट्रभूषण पुरस्कार, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.