नवी मुंबईतील बारमालकाची कर्नाटकात हत्या

हत्येप्रकरणी चौघांना अटक 

नवी मुंबई : सीबीडी येथील माया बारचा चालक-मालक वशिष्ठ यादव याची कर्नाटकातील उडपीमध्ये बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलामध्ये हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. 

सीबीडीतील माया बारचा चालक-मालक असलेला वशिष्ठ यादव याचा मृतदेह 10 फेब्रुवारीला कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील बेलनहल्ली येथील कुक्के गावलागतच्या जंगलामध्ये आढळून आला. कर्नाटक पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले असता, त्याचा मृत्यू वायरीने गळा आवळून झाल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, सदर व्यक्ती हा नवी मुंबईतील सीबीडी परिसरातील माया बारचा चालक-मालक असल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे. सुमित मिश्रा (23), अब्दुल शुकूर (35), अविनाश कारकेरा (25) आणि मोहम्मद शरीफ (32) अशी त्यांची नावे आहेत. सुमित हा माया बारमध्ये आधी काम करत होता. तर इतर तिघे जण एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि वशिष्ठ यांच्यात तीन महिन्यांपूर्वी पैशांवरून भांडण झाले होते. यानंतर त्याने नोकरी सोडली होती.

सुमित याने वशिष्ठ यांना उडपी येथे आणले आणि वायरीने गळा आवळून हत्या करण्यात आली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले होते. तपासासाठी पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले होते. या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोध लावत आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे.