जलवाहतुकीसाठी निधी वर्ग करण्याची मागणी

खा. राजन विचारे यांचे केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र

नवी मुंबई ः ठाणे महानगरपालिकेने बनविलेल्या जलवाहतूक प्रकल्पाचे काम महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डमार्फत सुरू असून, या कामाला गती देण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे निधी लवकरात लवकर वर्ग करण्याची मागणी केली आहे. 

ठाणे शहराला लाभलेला खाडीकिनारा तसेच शहरात होणारी वाहतूककोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा पर्याय आवश्यक असल्याने ठाणे महानगरपालिकेने यासाठी पुढाकार घेऊन तत्कालीन जलवाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे 31 जुलै 2017 रोजी या प्रस्तावाचे ठाणे महापालिका मार्फत सादरीकरण करून या प्रस्तावाला 24 ऑक्टोबर 2018 रोजी 645 कोटींची मंजुरी मिळवली होती. याचे नियोजनाचे काम प्रगतिपथावर करण्यासाठी सल्लगाराच्या नियुक्तीसाठी ठाणे महानगरपलिकेने 21 कोटी रुपये खर्चापैकी पहिल्या टप्प्यातील बनविलेल्या डी.पी.आर.साठी सहा कोटी रुपये खर्च केले असून, त्यापैकी दुसर्‍या टप्प्यातील डी.पी.आर.साठी 15 कोटी खर्च अपेक्षित आहे. याचे काम प्रगतिपथावर आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल व जलवाहतूक केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची 17 जुलै 2019 प्रत्यक्ष भेट घेऊन या विकास प्रकल्पाबाबत सादरीकरण करून चर्चा करण्यात आली होती. यामध्ये 100% अनुदान देण्याचे मंजूर करण्यात आले व हे काम तांत्रिकदृष्ट्या मेरीटाइम बोर्डमार्फत सुरू करण्याचे आदेश निर्गमित केल्यानंतर 2 जानेवारी 2020 रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील दहा जेटीपैकी मीरा-भाईंदर, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली या चार जेटीची कामे सुरू करण्यासाठी 86 कोटींचा सविस्तर प्रस्ताव केंद्रीय अनुदान प्राप्त होण्यासाठी मेरीटाइम बोर्डास ठाणे महानगरपालिकेमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड मुंबई यांना अग्रषित केले असून, या पहिल्या टप्प्यातील चार जेट्टीच्या सुरू झालेल्या कामासाठी 86 कोटींचा निधी निर्गमित करण्यासाठी संबंधितांना आदेश पारित करावे. तसेच उर्वरित सहा जेट्टीची कामे प्रगतिपथावर होण्यासाठी उर्वरित 559 कोटींचा मंजूर निधीही लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली.

तसेच दुसर्‍या टप्प्यातील ठाणे ते मुंबई व नवी मुंबई या 93 किलोमीटरचा मार्गवरही 18 जेटीची व अनुषंगिक कामे सुरू होण्यासाठी आवश्यक लागणारा 717 कोटींचा निधीही लवकर मंजूर करावा. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन जलवाहतूक प्रकल्प यशस्वी पूर्ण करण्यासाठी सल्लागारासाठी 21 कोटी आपल्या तिजोरीतून खर्च केले आहे तरी हा खर्च महापलिकेस उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी खा. राजन विचारे यांनी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली.