Breaking News
दीर्घकाळ बंद इमारत खुली करण्यासाठी वाशीकरांची साद
नवी मुंबई : वाशी सेक्टर 9 ए मधील वाचनालय व सांस्कृतिक भवन इमारत दीर्घकाळ बंद असल्याने दुरवस्था झाली आहे. लवकरात लवकर या इमारतीची डागडुजी करून विद्यार्थी व नागरिकांकरिता खुली करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. शहरातील नागरिकांच्या सोयीकरिता व विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता प्रत्येक विभागात नवी मुंबई महापालिकेने वाचनालय तसेच सांस्कृतिक भवन उभे केले आहे. परंतु त्यातील काही इमारतींची देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. वाशी सेक्टर 9 ए मधील शिव-विष्णू मंदिरानजीक असणाऱ्या वाचनालय व सांस्कृतिक भवन च्या इमारतीची देखील देखभालीअभावी जीर्ण अवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. काही वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तेथील स्थानिक नगरसेवक अविनाश लाड यांनी नागरिकांच्या सोयीकरिता ही इमारत भाडेतत्त्वावर घेतली होती. परंतु कोविड महामारी व त्यानंतरच्या काळात या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मंदावली. काही समाजकंटकांकडून इमारतीमधील पंखे तसेच ट्यूबलाईटची चोरी करण्यात आली. त्यामुळे वाचनालयाची ही इमारत बंद ठेवल्याचे लाड यांनी स्पष्ट केले.
हे वाचनालय पुन्हा सुरू व्हावे याकरिता काही महिन्यांपूर्वी महापालिकेस या इमारतीचा ताबा दिल्याचे लाड यांनी सांगितले. इमारत दीर्घकाळांपासून बंद असल्याने तीची पडझड झाली आहे. दरवाजे तुटले आहेत. तसेच इमारतीवर वृक्ष वाढले आहे. एकंदरीत इमारतीची झालेली दुरवस्था व विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय पाहता परिसरातील नागरिकांमधून हे वाचनालय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
स्थानिक नगरसेवक यांनी ही इमारत भाडेतत्त्वावर घेतली होती. गेल्या महिन्यातच या इमारतीचा ताबा मनपाने घेतला आहे. लवकरात लवकर डागडुजी करून या ठिकाणी पुन्हा वाचनालय व सांस्कृतिक भवन सुरू केले जाईल. तसेच परिसरातील स्वच्छतेवर ही भर दिला जाईल. - वाघ, मुख्य ग्रंथपाल, नवी मुंबई महानगरपालिका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे