Breaking News
- अपर पोलीस महासंचालक डॉ.सुरेश कुमार मेकला यांचे आवाहन
नवीमुंबई, दि. 29 :- कोकणातील गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहनांची वर्दळ नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबईचे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ. सुरेश कुमार मेकला यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रायगड पोलीस अधिक्षक (महामार्ग) तानाजी चिखले, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे, पुणे विभाग महामार्ग पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सोनवणे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
07 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सव काळात राज्याच्या विविध ठिकाणांहून चाकरमाने कोकणात आपल्या गावी मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि.07 व 08 रोजी शनिवार व रविवार आल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक डॉ. मेकला यांनी दिली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. वाहतुक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत. घाट क्षेत्रातील दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. महामार्ग क्र. 48 वर किरकोळ दुरुस्ती अंतर्गत खड्डे बुजविणे, बाजूपट्ट्या दुरुस्त करणे, लेन मार्किंग करणे, माहिती फलक स्वच्छ करणे इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. बोर घाटात अपघात कालीन परिस्थिती उद्भवल्यास एकूण 4 ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियोजन करण्यासाठी घाट निरिक्षक प्रतिसाद पथक 24 तास तैनात करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या जनतेची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत 3 हजार ते 4 हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघात टाळण्याकरिता चालक आणि वाहक यांची अल्कोहोल चाचणी करण्यात येणार आहे. सहा अपघात प्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पथक तैनात ठेवण्यात येणार आहेत. बसस्टँडवरील चोरी सारखे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी मंडळामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.
राष्ट्रीय महामार्गावर गणेश भक्तांच्या सेवा सुविधांसाठी दर 15 कि.मी. अंतरावर “सुविधाकेंद्र” उभारण्यात येणार असून, या सुविधा केंद्रात आरोग्य विषयक सुविधा, शौचालय, चहापान कक्ष, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहेत. तसेच वाहनांच्या दूरुस्तीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी अवधी असून या काळात सर्व संबंधित विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या कामांची नियोजित ठिकाणी रंगित तालीम करावी. जेणे करुन उद्भवणाऱ्या अडचणींवर वेळे आधी मात करता येईल. यावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील ब्लॅक स्पॉट, रस्ते दुरुस्ती तसेच इतर अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai