विद्यार्थ्यांनी दिला जैव इंधन वापरण्याचा संदेश

सायन्स कार्निवलमध्ये एन.आर.बी एज्युकेशन ट्रस्टचा प्रकल्प द्वितीय

नवी मुंबई : एम. ई. एस. विद्यामंदिर संस्थेच्या 160 व्या वर्धपानदिना निमित्ताने बेलापूर येथे आयोजित सायन्स कार्निवल या विज्ञान प्रदर्शनात नेरुळ येथील एन.आर. भगत एज्युकेशनल ट्रस्टच्या इयत्ता 7 वीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जैव इंधनाचा वापर प्रकल्पाला द्वितीय क्रमांक देवून सन्मानित करण्यात आले.  

एम.ई.एस. विद्यामंदिर संस्था स्थापनेला नुकतेच 160 वर्षे पुर्ण झाल्याने शनिवार 8 फेब्रुवारी रोजी बेलापूर येथे सायन्स कार्निवल विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात नेरुळ येथील एन.आर. भगत एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सुशील बारडे व प्रियंका बावधने या विद्यार्थ्यांनी भविष्यातील ऊर्जा संकट दूर करण्यासाठी जैव इंधनाचा वापराबाबतचा प्रकल्प प्रदर्शनात सादर केला होता. जैव इंधने कशापासून तयार करता येतात, त्यास कोणत्या प्राक्रियांचा समावेश असतो याबाबत माहिती देत भविष्यात निर्माण होणार्‍या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी जैव इंधनाचा वापर करण्याचा संदेश दिला.  

एन.आर.बी ट्रस्टच्या शाळेतील सायन्स व विज्ञान विभागातील शिक्षिका वृषाली परदेशी, मुख्याध्यापिका वंदना पाटील, शिक्षिका सुगंधा घुले, सुनिता वीर, सुनिल परदेशी, के. के. जाधव, निराशा मोकल, सुनंदा नौकुडकर व प्रेरणा ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान एन.आर. बी. ट्रस्टच्या शाळेमध्ये देखील जैव इंधन निर्मितीचा प्रयत्न करुन हरित ऊर्जेचा वापर करण्याचा सल्ला देत प्रकल्प तयार करणार्‍या विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक एन.आर.बी. ट्रस्टचे संस्थापक नामदेव भगत यांनी केले.