‘त्या’ भूमीचे राज उलगडले

भूमिराज ग्रुपचे संचालक भूपेंद्र शहा यांना अटक 

नवी मुंबई ः लातूर येथील बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे नवी मुंबईतील गव्हाण येथील सर महम्मद युसुफ ट्रस्टची 400 कोटी रुपयांची 80 एकर जमीन बळकावल्याप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी भूमिराज ग्रुपचे संचालक भूपेंद्र शहा यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असली तरी सध्या ते उच्चरक्तदाबाच्या त्रासामुळे वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सर महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारुन अलीम याच्याशी संगनमत करून ट्रस्टची 80 एकर जागा सन 1995 मध्ये चार लाख रुपयांत (रोखीने) खरेदी केल्याचा आरोप असलेले भूपेंद्र शहा यांनी बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे शेकडो कोटींची ही जमीन हडप करून फसवणूक केल्याची तक्रार मे. रिगल हेबिटेट प्रा. लि. या कंपनीचे प्रतिनिधी विक्रम भणगे यांनी न्हावा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भूपेंद्र शहा, किरण दांड व महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारुन अलीम ए. आर. युसुफ, सुरेश शेडगे, बाज खान, रमेश भालेराव व इतर यांच्याविरुद्ध बनावट सरकारी कागदपत्रे बनवून जमीन लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रथम रमेश भालेराव, नंतर सतीश शिर्के याला अटक केली. बुधवारी भूपेंद्र शहा यांना अटक केली.

महम्मद युसुफ ट्रस्टची 80 एकर जमीन संपूर्ण दलदलीची व खारफुटीयुक्त असल्यामुळेच ही जमीन चार लाख रुपयांत विकत असल्याचे ट्रस्टच्या ठरावात अध्यक्ष हारुन अलीम याने म्हटले आहे. त्यामुळे ही खारफुटीयुक्त जमीन आता सिडकोच्या घशात घालून सिडकोकडून साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत सुमारे 50 हजार चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड प्राप्त करण्याचा डाव संबंधित बिल्डरने महसूल व सिडकोच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून आखला असल्याचा आरोप तक्रारदार विक्रम भणगे यांनी केला होता. याबाबत वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल होऊन तसेच भूपेंद्र शहा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाऊनही कोणतीही कारवाई नवी मुंबई पोलिसांनी न केल्याचा आरोप त्या वेळी विक्रम भणगे यांनी केला होता. दरम्यान, बुधवारी भूपेंद्र शहा यांना न्हावा-शेवा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. मात्र, शहा यांना उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

चौकट

पवारांच्या भेटीनंतर कारवाईला वेग

भूपेंद्र शहा यांच्यावर गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटून गेले तरी कोणतीही अटकेची कारवाई नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली नव्हती. दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी ऊर्मेश उडाणी यांच्या युसर गु्रपच्या वाशीतील कार्यालयाला भेट दिल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी भूपेंद्र शहावर ही कारवाई केल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत सुरू आहे.