नवी मुंबई भाजपला ‘बंडखोरी’चा व्हायरस

नवी मुंबई ः एप्रिलमध्ये होणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांना सध्या बंडखोरीच्या व्हायरसने ग्रासले आहे. भाजपच्या 15 नगरसेवकांना सध्या महाविकासाच्या व्हायरसची लागण झाल्याने त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. या बंडखोरीला माजी मंत्री व आमदार गणेश नाईक कशा पद्धतीने लगाम घालतात, यावर भाजपच्या यशाची मदार असल्याचे राजकीय समीक्षकांचे मत आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःचे राजकीय भवितव्य सावरण्यासाठी राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांना धक्के देण्यास महाविकास आघाडीने सुरुवात केली आहे. दहा वर्षे मंत्रिपद व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद,   

शिवाय घरात महापौरपद देऊनही राष्ट्रवादीशी प्रतारणा करणार्‍या गणेश नाईकांना धडा शिकवण्याचा चंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्यास शिवसेनेची साथ मिळत असून, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील पहिल्याच महापालिका निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत 49 नगरसेवक घेऊन भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी चालवला आहे. 

महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसत असून, गणेश नाईकांचे खंदे समर्थक सुरेश कुलकर्णी हे शिवसेनेच्या वाटेवर असून, तुर्भेतील पाटील परिवार हा राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. सुरेश कुलकर्णी यांचा तुर्भे, तुर्भे स्टोअर, तुर्भे नाका व पावणे एमआयडीसी परिसरावर चांगला पगडा असून, भाजपच्या दहा जागांना त्याचा थेट फटका बसू शकतोे. त्याचबरोबर नेरुळचे संदीप सुतार, वाशीतील राजू शिंदे यांच्यासह तुर्भेतील पाटील परिवाराने गुरुवारी अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या वाटचालीचा संदेश गणेश नाईकांना दिला. कोपरखैरणेचे शंकर मोरे, ऐरोलीतील अशोक पाटील, दिघ्यातील गवते कुटुंबीय यांच्याबाबतही महाविकास आघाडी सकारात्मक असून, त्यांनी महाविकास आघाडीत यावे म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वतः गणेश नाईक यांनी दोन वेळा पक्षांतर केले असल्याने नैतिकतेच्या दृष्टीने ते ही बंडखोरी रोखण्यास असमर्थ असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी झालेल्या प्रभाग रचनेवरील निर्णयानंतर तसेच आगामी सर्वसाधारण सभेनंतर बंडखोरीची लागण वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकासाची लागण होऊन पसरलेला हा बंडखोरीचा व्हायरस रोखण्यात नाईक यशस्वी ठरतात की, ते स्वतः या व्हायरसचा बळी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मुस्लीम समाज व माथाडींच्या नाराजीमुळे बंडखोरी

भाजपने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला असून, भविष्यात ते एनआरसी आणणार असल्याची चर्चा देशात आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाने देशभरात आंदोलन करण्यास सुरुवात केली असून, भाजपच्या विरोधात मतदान करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दलित समाजही भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने त्याचाही फटका भाजपला बसण्याच्या शक्यता आहे. नवी मुंबईत ही बंडखोरी मुस्लीमबहुल प्रभागात होत असल्याचे बोलले जात आहे, तसेच माथाडीबहुल प्रभागात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याने तेथेही बंडखोरीच्या व्हायरसची लागण झाली आहे.